बातम्या

थरथरत्या हातांना गोकुळचा लाखमोलाचा आधार ! सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञतेचा भाव !!....

Gokuls support for trembling hands A sense of gratitude to retired employees


By nisha patil - 11/28/2023 5:58:58 PM
Share This News:



कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ (गोकुळ)च्या वतीने संघाच्‍या सन १९६३ च्या संघ स्थापनेवेळी गोकुळचे शिल्पकार स्व.आनंदराव पाटील (चुयेकर) यांना मोलाचे सहकार्य करून सुरवातीच्या प्रतिकूल परिस्थितीत कष्ट केलेल्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञतेचा भाव आणि सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत त्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या योगदानाबद्दल संघाचे चेअरमन अरूण डोंगळे यांच्‍या हस्‍ते व संचालक मंडळाच्‍या उपस्थितीमध्‍ये अर्थ सहाय्याचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला आहे. 
जुने ऋणानुबंध मजबूत करण्यासाठी कृतज्ञता एक प्रभावी साधन आहे. कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञतेचा भाव जपत गोकुळने केलेली मदत नव्वदीकडे झुकलेल्या त्या सेवानिवृत्तांच्या थरथरत्या हातांना लाखमोलाची ठरेल. असे भावोद्गार गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी याप्रसंगी काढले.हा कार्यक्रम संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला आहे. गोकुळने लाखमोलाचा आधार दिल्याने हे वृद्ध कर्मचारी भारावले. गोकुळ आणि कर्मचाऱ्यांतील ऋणानुबंध घट्ट करणाऱ्या या क्षणाने सर्व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. यावेळी पुढे बोलताना संघाचे चेअरमन अरूण डोंगळे म्‍हणाले कि, आज गोकुळचा चौफेर विस्तारलेला वटवृक्ष आपण पाहतो परंतु या वटवृक्षाचे रोपटे स्व.आनंदराव पाटील (चुयेकर) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९६३ साली लावले आणि ते वाढवण्यासाठी तत्कालीन संचालकापासून कर्मचाऱ्यांपर्यंत सारेच जण झपाटून कामाला लागले, त्याकाळी कर्मचाऱ्यांना कोणत्याही सोयी सुविधा नसताना प्रतिकूल परिस्थितीत तुटपुंज्या पगारावर अविरत कष्ट घेतले, निवृत्ती वेतनाच्या कायद्याचा अभाव मात्र ही मंडळी हटली नाहीत. गोकुळ वाढला पाहिजे या भावनेतून संघाच्या प्रारंभीच्या कालावधीत त्यांनी मोठे योगदान दिले म्हणूनच आजचा ‘गोकुळ’ आपण पाहतो.

          संघाच्या स्थापनेच्या कालावधीतील अनेक कर्मचारी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. संघ स्थापनेच्या सुरवातीच्या काळात कार्यरत असणाऱ्या आणि नव्वदीकडे झुकलेल्या सात कर्मचाऱ्यांनी आपली परिस्थिती बेताची असल्याने आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून गोकुळकडे मागणी केली होती. अशा कर्मचाऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून जे सात कर्मचारी आज हयात आहेत, त्यांना वृद्धापकाळात आर्थिक बळ मिळावे, म्हणून नव्वदीकडे झुकलेल्या त्या सात निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानाबद्दल आर्थिक मदत देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला त्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्याने प्रत्येकी दीड लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली.

 गोकुळ दूध संघाची १९६३ मध्ये स्थापना झाली. संघाच्या स्थापनेपासून अनेक कर्मचारी काम करत होते. त्या काळी पेन्शन कायदा अंमलात नव्हता. गोकुळमध्ये १९७३ मध्ये पेन्शन कायदा अंमलात आला. त्याप्रसंगी व्यवस्थापनाने स्थापनेपासून म्हणजे १९६३ ते १९७३ या कालावधीतील संघाकडून व कर्मचाऱ्यांकडून भरावयाची वर्गणी जमा झाल्यास संबंधितांना निवृत्ती वेतनाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. दहा वर्षाचा पेन्शन फरक भरल्यास संबंधितांना पेन्शन कायद्यात समाविष्ठ करण्याचे धोरण होते. मात्र त्याकाळी कमी पगार आणि संघही तोट्यात असल्यामुळे सदरची वर्गणी कर्मचाऱ्यांनी व संघानेही भरलेली नाही. यामुळे सदर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नाही. परिणामी संस्था स्थापन कालावधीतील कर्मचारी पेन्शन योजनेपासून वंचित राहिले. कालांतराने अनेक कर्मचारी निवृत्त झाले. संघ स्थापनेच्या प्रारंभीच्या काळात काम केलेल्या कर्मचाऱ्या पैकी सध्या हयात असलेले सेवानिवृत्त कर्मचारी जनार्दन भाऊसो यादव, बाबूराव दत्तात्रय पाटील, मनोहर कल्लाप्पा बेळगांवकर, आत्माराम नरसिंह मगदूम, अमृतराव आप्पाजी देसाई, बाळासो शंकर कातकर, विष्णू कृष्णा पाटील यांना गोकुळच्या अर्थसहाय्याचा लाभ झाला.

यावेळी बोलताना सेवानिवृत्त बोर्ड सेक्रेटरी जनार्दन देसाई यांनी गोकुळमुळेच आम्ही जीवनात यशस्वी झालो याचबरोबर आम्हाला मान सन्मान प्राप्त झाला गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांनी आम्हा सर्वांच्या योगदानाची दखल घेऊन आमच्या थरथरत्या हातांना गोकुळने लाखमोलाचा आधार दिलेबद्दल आभार मानले.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले तर आभार सहा.महाव्यवस्थापक (डेअरी) अनिल चौधरी यांनी मानले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, अमरसिंह पाटील, सुजित मिणचेकर, बाळासो खाडे, चेतन नरके, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, सहा.महाव्यवस्थापक  अनिल चौधरी, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, बाजीराव राणे व संघाचे अधिकारी तसेच सेवानिवृत्‍त कर्मचारी उपस्थित होते.


थरथरत्या हातांना गोकुळचा लाखमोलाचा आधार ! सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञतेचा भाव !!....