बातम्या

उत्तम शिक्षण हेच भविष्य- डॉ. रघुनाथ माशेलकर

Good education is the future Raghunath Mashelkar


By nisha patil - 7/2/2024 11:39:39 PM
Share This News:



शिक्षणामुळेच व्यक्ती समृद्ध बनतो. उत्तम शिक्षण हेच भविष्य असून चांगल्या शिक्षणातूनचा स्वत:ची व देशाची प्रगती घडेल. शिक्षण क्षेत्रात नवकल्पना व सातत्यपूर्ण संशोधन गरजेचे आहे. सरस्वती व लक्ष्मी यांचा मेळ घालून कार्यरत राहिल्यास देशासाठी भविष्यकाळ उज्वल असेल असे प्रतिपादन जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, थोर विचारवंत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी तळसंदे येथे काढले.

  ह. भ. प.  यशवंतराव भाऊराव पाटील यांच्या ७० व्या स्मृतीदिनानिमित्त तळसंदे येथील डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटीमधील शांताई सभागृहात ‘इन्वेंशन, इनोव्हेशन अँड इंक्युबेशन इन एज्युकेशन’ या विषयावर डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी ह. भ. प.  यशवंतराव भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस्थळी त्यांनी आदरांजली वाहिली. 

  डी. वाय. पाटील ग्रुपमध्ये शिक्षण घेत असलेल्या सुमारे २ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. माशेलकर यांनी शिक्षण व त्यामधील नवकल्पना, संशोधन आणि विकास यावर मार्गदर्शन केले. शैक्षणिक क्षेत्रात क्रांती होत असताना डी. वाय. पाटील समुहाने आधुनिक विद्यार्थी घडविण्याचे काम नेटाने सुरू केले असल्याचे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले. यावेळी जडण घडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ॠतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

डॉ. माशेलकर म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारल्यानेच भारत राष्ट्र जगात पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तम शिक्षण हेच भविष्य असून त्यासठी इनोव्हेंशन होण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाळेत, कोणत्याही भाषेत शिक्षण घ्यावे पण नवं निर्मितीचा ध्यास धरावा. लक्ष्मी आणि सरस्वती यांचा नेहमीच मेळ घातला पाहिजे. आपल्याकडे बुद्धिमत्तेची कमी नाही, मात्र त्याचा वापर आपल्या देशासाठी व्हावा असा प्रयत्न झाला पाहिजे. उत्तम तंत्रज्ञान अवगत करून विद्यार्थ्यांनी आपल्या देशातच ‘गुगुल’ व ‘मायक्रोसॉफ्ट’ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन डॉ. माशेलकर यांनी केले.

डॉ. माशेलकर यांनी दिली यशाची पंचसूत्री
विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आपल्या आकांक्षा मोठ्या ठेवाव्यात, कामावर फोकस ठेवावा, संधीची वाट पाहत न राहता स्वतःचा मार्ग स्वतः निवडा, भरपूर कष्ट करा आणि आजून आपल्या चांगले काम करायचे आहे, मोठे यश मिळवायचे आहे हा विचार मनात ठेऊन कार्यरत रहा अशी यशाची पंचसूत्री डॉ. माशेलकर यांनी दिली.

यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली, तसेच उर्वरित प्रश्नांना ई-मेल द्वारे उतारे देण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार ऋतुराज पाटील यांनी केले तर आभार डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ जे  ए खोत यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. मधुगंधा मिठारी आणि प्रा. श्रुती काशीद यांनी केले.

  यावेळी सौ. स्मिता सागर देशपांडे, संस्थेचे सचिव श्रीपाद धरणगुत्ती, सी.एच.आर. ओ. श्रीलेखा साटम, डॉ. महादेव नरके, डॉ. अभिजित माने यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, विभागप्रमुख व २ हजारांहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते.


उत्तम शिक्षण हेच भविष्य- डॉ. रघुनाथ माशेलकर