बातम्या

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

Good news for dairy farmers


By nisha patil - 4/1/2024 7:33:25 PM
Share This News:



दुधाला अनुदान देण्यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  दुधासाठी सरकार 5 रुपयांचं अनुदान देणार आहे. त्यामुळं पाच रुपयांच्या सबसिडीसह दूध उत्पादक शेतकऱ्यांना 32 रुपयांचा दर मिळणार आहे. हा दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल. 32 रुपयाचा दर ठरल्यास दूध संघांना शेतकऱ्यांना 27 रुपये प्रति लिटर दर द्यावा लागणार आहे. 
नागपूर अधिवेशनात मंत्री विखे पाटलांनी केली होती घोषणा

 

राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर 5 अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले होते. मात्र, घोषणेनंतर याबाबतचा कोणताही आदेश अद्याप निघाला नव्हता. दरम्यान, आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील 72 टक्के दूध खासगी संस्थांना दिले जाते आणि सरकारनं दिलेलं अनुदान फक्त सहकाराला आहे.त्यामुळं बहुतांश दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार आहेत. त्यामुळं सरकारनं सर्वांना अनुदान द्यावं, अशी मागणी किसान सभेनं केली होती. 

दरम्यान, डीबीटी  करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी आणि पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. त्याची पडताळणी करणं आवश्यक राहील. ही योजना दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी लागु राहणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेवून मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. ही योजना आयुक्त यांच्या मार्फत राबविली जाणार आहे. याबाबतीत शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले होते. मात्र, सहकारी बरोबरच खासगी संस्थांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यात यावं अशी मागणी वारंवार केली जात होती.


दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी