बातम्या
शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणा-या अभ्यागतांना थंड पेये पिण्यासाठी उपलब्ध करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 2/4/2024 5:13:07 PM
Share This News:
कोल्हापूर, : जलशुष्कता प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शालेय स्तर तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयात येणा-या अभ्यागतांना वॉटर बेल तसेच कॉफी, चहा सारखी उष्णपेये न पिता थंड पेये पिण्यासाठी उपलब्ध करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत जिल्हाधिकारी श्री. येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्राणिजन्य आजाराच्या प्रतिबंध व नियंत्रण एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, वातावरणातील बदल व मानवी आरोग्य या विषयांवर जिल्हा स्तरावर आढावा बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी 28 सदस्य उपस्थित होते.
यावेळी सदस्य सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी उपस्थित अध्यक्ष व सदस्यांचे स्वागत केले. ते म्हणाले, निवडणूक मतदान प्रशिक्षण ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना करा. याबाबत प्रसिध्दी व जनजागृती करा. मतदानाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, सावलीसाठी मंडप, औषध किट यांच्या उपलब्धतेबाबत मागदर्शक सुचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी टास्क फोर्सची उद्दीष्टे, कार्य व कृती याबद्दल विस्तृत माहिती दिली. वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य या संदर्भातील जिल्हा कृती योजना आखणे व या कृती योजनेची अंमलबजावणी करणे हा जिल्हा टास्क फोर्सचा उद्देश असून वातावरणातील बदलाचा परिणाम होणारे आजार ओळखणे हा या टास्क फोर्सचे मुख्य कार्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी शेतामध्ये काम करणारे शेतमजुर, व्यायाम करणारी तरुण मुले, शालेय मुले, तसेच कायम प्रवास करणाऱ्यांना जलशुष्कता होऊ नये म्हणून पाण्याची बाटली सोबत ठेवणे याबाबत जनजागृती करण्यासाठी आशा मार्फत घरोघरी संदेश देण्याच्या सुचना दिल्या. उष्माघात टाळण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रसिध्दी व जनजागृती करणे, या संदर्भात स्थानिक नारिकांचा सहभाग घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
ते म्हणाले, वातावरणातील बदल व मानवी आरोग्यावर माझी वसुंधरा अभियानात ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिका स्तरावर वृक्षारोपण व इतर विभागांशी समन्वय साधुन या कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. वातावरणातील बदलामुळे पुरपरिस्थितीच्या काळात पुरामुळे जलजन्य व किटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपायोजना प्रभावी राबविणे, डासोत्पत्तीस्थाने नष्ट करणे व इतर कार्यवाही करण्यासाठी नागरिकांचा सहभाग घ्यावा.
प्राणीजन्य आजार कार्यक्रम अंतर्गत रेबीज मुत्युच्या प्रमाणात शून्य टक्के घट होण्यासाठी IMA मार्फत खासगी व शासकीय वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभाग व बाह्यरुण विभागाकडील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
कुत्रा चावल्यानंतर जखम स्वच्छ पाण्याने धुण्यासाठी आशा मार्फत आरोग्य शिक्षण तसेच बोगस डॉक्टर, भोंदू व्यक्ती तसेच इतर ठिकाणी उपचारास न जाता शासकीय दवाखान्यामध्ये त्वरीत उपचार घेण्यासाठी जनजागृती करावी. ग्रामीण भाग, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या व पाळीव कुत्र्यांचे १०० टक्के निर्बीजीकरण व लसीकरण करण्याची अंमलबजावणी ग्रामपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकेने १५ दिवसांत करावी. यासाठी अशासकीय संस्था(NGO), आरोग्य विभाग व पशुसंवर्धन विभागाची मदत घ्यावी.
किटकजन्य आजारामध्ये विशेषता डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. ग्राम, नगरपालिका स्तरावर व्यापक प्रमाणात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग घ्यावा. जिल्ह्यातील डेंग्यु आजाराबाबत तीव्र जोखमीच्या गावांचा शोध घेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ अंमलात आणाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी महानगरपालिकेचे आरोग्यअधिकारी, जिल्हा साथरोग तज्ञ, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी, उप प्रादेशिक अधिकारी म.प्र.नि.मंडळ कोल्हापूर, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, प्राध्यापक बालरोग, भिषक, सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ, जिल्हा हिवताप अधिकारी, कम्युनिटी मेडीसीन सी. पी. आर. हॉस्पिटल कोल्हापूर, अन्न व औषध निरीक्षक, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेचे कनिष्ठ अधिकारी, शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाचे प्राध्यापक व इतर समिती सदस्य उपस्थित होते.
शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणा-या अभ्यागतांना थंड पेये पिण्यासाठी उपलब्ध करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे
|