बातम्या

राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने मोठा दिलासा

Great relief as all the automatic gates of Radhanagari Dam are closed


By nisha patil - 7/29/2023 5:30:04 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. एकाच दिवशी काही तासांमध्येच राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडल्याने भोगावती नदीपात्रात मोठा विसर्ग सुरु होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात आणखी धास्ती वाढली होती. मात्र, प्रत्यक्षात पावसाची उघडीप असल्याने संकट मागे टळले आहे.  राधानगरी धरणाचा तिसऱ्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बंद झाला. यानंतर रात्री आठ वाजता चार आणि सात नंबरचा दरवाजा बंद झाला. त्यानंतर अवघ्या 15 मिनिटांमध्ये 5 आणि 6 नंबरचा दरवाजा बंद झाला. त्यामुळे स्वयंचलित दरवाजातून भोगावती नदीपात्रातील विसर्ग बंद झाला आहे. सध्या केवळ पॉवर हाऊसमधून 1400 क्यूसेक्स विसर्ग सुरु आहे.गेल्या आठवडाभरापासून पंचगंगा नदी पात्राबाहेर पडून इशारा पातळीवरून वाहत आहे. जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेले होते. दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी पावसाने उघडीप दिल्याने 15 बंधाऱ्यांवरील पाणी उतरले आहे. त्यामुळेही मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील अजूनही 67 बंधारे पाण्याखाली आहेत.दरम्यान, कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर  पंचगंगा पाणी पातळी रात्री 9 वाजता 41 फुट 4 इंचांवर पोहोचली आहे. पावसाची उघडीप आणि राधानगरी विसर्ग बंद झाल्याने पूर ओसरण्यास मदत होणार आहे. 

कोल्हापूर शहरात जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून उघडीप महापुराचे संकट टळले आहे. राधानगरी धरणातून होत असलेला विसर्ग तसेच पंचगंगा नदी इशारा पातळीवरून वाहत असल्याने आणखी पावसाचा जोर वाढला असता, तर महापुराची टांगती तलवार अटळ होती. मात्र, हवामान विभागाने पावसाचा इशारा देऊनही उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पंचगंगेची पाणीपातळी 50 फुटांवर जाईल, असे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. जिल्हाधिकाऱ्यांनीही सुद्धा पाणी पातळी सात ते आठ फूट वाढेल, असे सांगितल्यानंतर तातडीने स्थलांतर सुरु करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात इंचाइंचाने वाढ होत असल्याने दिलासा मिळाला.


राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने मोठा दिलासा