बातम्या
शहाजी महाविद्यालयात बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन .
By nisha patil - 6/12/2024 10:10:17 PM
Share This News:
कोल्हापूर: दिन दलितांसाठी, स्त्रियांसाठी आणि देश उभारणीमध्ये बाबासाहेबांचे काम खूप मोठे आहे. बाबासाहेबांवर अभ्यास करताना पुरी हयात कमी पडेल. बाबासाहेबांचे गुण आणि विचार तरुणांनी, विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत असे आवाहन श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
इंग्रजी विभागातील प्राध्यापिका डॉ. सौ. शोभा चाळके- म्हमाने यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या तुम्हाला दोन रुपये मिळाले तर त्यातील एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल आणि पुस्तके तुम्हाला कसे जगायचे हे शिकवतील असे विचार बाबासाहेब आंबेडकर यांचे होते. पुस्तकांसाठी घर बांधणारे ते जगातील एकमेव व्यक्ती होते.त्यांनी 32 पदव्या आणि नऊ भाषा संपादन केल्या होत्या. इंग्रजी भाषे बरोबर संस्कृत वरही त्यांचे प्रभुत्व होते. वैचारिक प्रगल्भता विकसित करण्याचे शिक्षण हे मोठे साधन आहे असे ते मानित.
रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापक मनोज कांबळे म्हणाले, आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते म्हणून रामचंद्र गुहा यांनी बाबासाहेबांचा गौरव केला आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना न्याय हक्क दिलेले आहेत. बाबासाहेब केवळ शिक्षण तज्ञच नव्हते तर ते कृषी तज्ञ, अर्थतज्ञ, कायदा तज्ञ ही होते. अजही त्यांचे विचार प्रेरक आहेत.
स्वागत व प्रास्ताविक राजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आर.डी.मांडणीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.पी.के.पाटील यांनी केले. आभार डॉ. पांडुरंग पाटील यांनी मांनले .
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावरील 37 हून अधिक ग्रंथांचे प्रदर्शन यावेळी शिवाजी ग्रंथालयाच्या वतीने संपन्न झाले. सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यांनी या ग्रंथप्रदर्शनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध ग्रंथसंपदेची माहिती घेतली व पुस्तकांचे वाचन केले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली होती. 170 हुन अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. आई क्यू ए सी विभाग,ग्रंथालय व रसायनशास्त्र विभाग यांच्या वतीने विविध उपक्रम संपन्न झाले.श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे व प्राचार्य डॉ.आर.के. शानेदिवाण यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.
शहाजी महाविद्यालयात बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन .
|