बातम्या

पालकमंत्री केएमसी आढावा बैठक

Guardian Minister KMC review meeting


By neeta - 12/29/2023 5:27:05 PM
Share This News:



पालकमंत्री केएमसी आढावा बैठक

कोल्हापूर शहरातील नागरिकांना काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचं पाणी जलद मिळावं, रस्त्यांची कामं लवकर पूर्ण व्हावीत, तसंच कचऱ्याचं योग्य नियोजन लावावं, अशा सुचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या . काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचं लोकार्पण तसच शहरातील रस्त्यांच्या कामाचं उद्घाटन एकाचवेळी आणि लवकरच केलं जाईल, असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं . अमृत एक योजनेतील काम पूर्णत्वास येत आहे . अमृत दोन योजनेमधील कामंही एप्रिलपर्यंत पूर्ण होईल, असं त्यांनी सांगितलं . कोल्हापूर शहरातील ८८ किलोमीटरच्या प्रमुख रस्त्यांची कामं राहिली आहेत . त्यासाठी ९० कोटींचा निधी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून या रस्त्यांची कामंही पूर्ण केली जातील, अस त्यांनी सांगितल . शासन मराठा समाजाला आरक्षण देणार आहे . त्यामुळ मनोज जरांगे - पाटील यांच्यासह मराठा समाजाला मुंबईत जाऊन, उपोषण करण्याची वेळच येणार नाही, असं त्यांनी सांगितलं .

 कोल्हापूर शहरातील होणारी विकास कामं आणि प्रलंबित कामांबाबत आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के . मंजुलक्ष्मी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली . अमृत एक योजनेसाठी ११६ कोटी ७१ लाखांचा निधी उपलब्ध झाला असून, १२ उंच टाक्यांपैकी ३ टाक्यांचं काम पूर्ण झाल आहे . तसच २ संप हाऊसची कामही पूर्ण झाल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं . ही अमृत एक योजना जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं . अमृत दोन योजनेमध्ये पाईपलाईन, सांडपाणी प्रक्रिया केंद्र यासह उर्वरित कामं एप्रिलपर्यंत पूर्ण होतील, असं यावेळी सांगण्यात आलं . अमृत एक योजना आणि अमृत दोन योजना पूर्ण झाल्याशिवाय पंचगंगेचं प्रदूषण थांबणार नाही, तसच पिण्याच पाणीही व्यवस्थित उपलब्ध होणार नाही, असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल . पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी ३ सांडपाणी  प्रक्रिया प्रकल्प तयार केले जाणार असल्याचही त्यांनी सांगितल .
                 

  कोल्हापूर शहरातील १६  रस्त्यांच्या कामासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध

कोल्हापूर शहरातील १६  रस्त्यांच्या कामासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध झालाय . त्यातून या रस्त्यांची कामं लवकरच पूर्ण केली जातील .या रस्त्यांच्या कामांचं उद्घाटन आणि काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचं लोकार्पण एकाचवेळी आणि लवकरच मुख्यमंत्र्यांना बोलावून केलं जाईल, असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितल .कोल्हापूर शहरातील ८८ किलोमीटरच्या प्रमुख रस्त्यांची कामं राहिलेली आहेत . यासाठी ९० कोटींचा निधी लागणार आहे . हा निधी मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलून, शहरातील सर्व रस्त्यांची कामंही पूर्ण केली जातील, असं त्यांनी सांगितलं . महालक्ष्मी मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ६९ कोटींचा निधी उपलब्ध झाला होता . या हिवाळी अधिवेशनामध्ये यासाठी आणखी ४० कोटी रुपये मंजूर केल्याचं, त्यांनी सांगितलं . नगरोत्थान योजनेतून जिल्ह्यातील सर्व तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांचा प्रस्ताव पाठवला असून, त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल ,अस त्यांनी सांगितल .
             

कसबा बावडा इथल्या झूम प्रकल्पामध्ये १ लाख ६७ हजार ८७३ टन इतका कचरा साचून राहिलाय .हा कचऱ्याचा डोंगर कमी करण्यासाठी  महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं . कोल्हापूर शहरात दररोज २०० टन कचरा साचतो .या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याच्या सुचनाही दिल्याचं त्यांनी सांगितल . शहरातील कचऱ्याच्या उठावासाठी सध्या १७४ पैकी १६० टिप्पर कार्यरत असून, आणखी ३० टिप्पर उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी सांगितल . महापालिकेचा केएमटी विभाग सध्या तोट्यात आहे . केंद्र शासनानं मंजूर केलेल्या १००  इलेक्ट्रिक बसेसना वीजपुरवठा करण्यासाठी १७ कोटींचा प्रकल्प केंद्र शासन देणार असल्याच त्यांनी सांगितलं . त्यामुळ मोठी बचत होईल, अस त्यांनी नमूद केल . केएमटीच्या बस थांब्यासाठी १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याचं, त्यांनी सांगितलं . हद्द वाढ होईलच, असा पुनरूच्चार आजही त्यांनी केला . एकंदरित कोल्हापूरच्या नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा मिळून, शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं .  

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे - पाटील यांनी २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर संपूर्ण मराठा समाजाच्यावतीनं उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय . मात्र राज्य शासन मराठा समाजाला आरक्षण देणारच आहे . त्यामुळ या मराठा समाजाला उपोषण करण्याची वेळच येणार नाही, असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितल . यावेळी महापालिकेच्या प्रशासक के .मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, शहर अभियंता हर्षजित घाटगे,जल अभियंता नेत्रदीप सरनोबत ,उपायुक्त साधना पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक,उपशहर अभियंता नारायण भोसले, अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी मनीष रणभिसे, यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते .


पालकमंत्री केएमसी आढावा बैठक