बातम्या
शिवनाकवाडीत ऊसतोड मजुरांना साहित्य वाटप करुन आनंदी दिवाळी साजरी
By nisha patil - 6/11/2024 6:44:02 PM
Share This News:
शिवनाकवाडीत ऊसतोड मजुरांना साहित्य वाटप करुन आनंदी दिवाळी साजरी
दानशूर व्यक्तींच्या मदतीने विद्योदय मुक्तांगण परिवारचा सामाजिक उपक्रम
इचलकरंजी : प्रतिनिधी
कोणताही सण ,उत्सवाचा आनंद हा माणुसकीबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दुस-यांना मदतीचा व सहकार्याचा हात देऊनच अधिक चांगल्या पध्दतीने साजरा करता येतो.याचा प्रत्यय नुकताच शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे विद्योदय मुक्तांगण परिवारने दानशूर व्यक्तींच्या मदतीने
नंदुरबार जिल्ह्यातून ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांच्या कुटूंबांना दिवाळी सणासाठी लागणारे साहित्य वाटप करुन आणून दिला.या उपक्रमाने ऊसतोड मजुरांची अनोखी आनंदी दिवाळी साजरी झाल्याचा वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा हा प्रामुख्याने ऊस शेतीचा पट्टा म्हणून ओळखला जातो.त्यामुळे ऊस पिकाचे मोठे उत्पादन होत असल्याने या परिसरात साखर कारखान्यांची संख्याही लक्षणीय आहे.दरवर्षी दस-यानंतर साखर कारखान्यांचे बाॅयलर अग्नी प्रदीपन होताच सोलापूर ,बीड , लातूर , उस्मानाबाद व मराठवाड्यातील अन्य जिल्हे ,सांगली जिल्हा आणि कर्नाटकातून ऊसतोडीसाठी मोठ्या प्रमाणात मजुरांच्या टोळ्या आपल्या कुटूंबासमवेत कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होतात.त्यामुळे या मजुरांचे कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी सुरु असलेले
भटकंतीचे जगणे सुसह्य होऊन ते विकासाच्या मुख्य प्रवाहात यावेत ,त्यांच्या मुलांचे खंडित झालेले शिक्षण पूर्ववत सुरु होऊन त्यांच्यामध्ये विविध जीवन कौशल्ये रुजावीत या उदात्त हेतूने हंगामी साखर शाळा व इतर सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी अब्दुललाट येथील विद्योदय मुक्तांगण परिवारने प्रामाणिक धडपड सुरु ठेवली आहे.
यंदाच्या वर्षीही येत्या काही दिवसात ऊस गळीत हंगाम सुरु होत असल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी ऊसतोड करण्यासाठी अगदी तुरळक प्रमाणात ऊसतोड मजुरांच्या टोळ्या शिरोळ तालुक्यासह अन्य ठिकाणी दाखल होऊ लागल्या आहेत.शिवनाकवाडी येथेही नंदूरबार जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत.पण , अद्याप ऊसतोडीचे काम सुरु न झाल्याने हातात पैसाच नसल्याने या मजुरांच्या कुटूंबाची दिवाळी कशी साजरी होणार ? अशी चिंता न संपणारी आहे.याच सामाजिक जाणिवेतून
विद्योदय मुक्तांगण परिवारने ऊसतोड मजुरांना दिवाळी सणासाठी साहित्य वाटप करण्याच्या उद्देशाने समाजातील दानशूर व्यक्ती,संस्थांना मदतीचे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत माणुसकी व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नॅनो - मॅग कंपनीचे संस्थापक सतीश पवार , राष्ट् सेवा दलाचे संघटक बाबासाहेब नदाफ व अन्य दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने ऊसतोड मजुरांना सुगंधी साबण ,तेल ,कपडे व अन्य जीवनावश्यक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी ऊसतोड मजुरांच्या चेह-यावरचा आनंद हा उपस्थितांना आनंदी दिवाळीचा प्रत्यय आणून देणारा ठरला.यावेळी बाबासाहेब नदाफ ,
विद्योदय मुक्तांगण परिवारचे अध्यक्ष विनायक माळी , सचिव सौ.सार्शा माळी , संतोष खोत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ,सर्व शिक्षक , ऊसतोड मजूर व ग्रामस्थ उपस्थित होते.या सामाजिक उपक्रमाने ऊसतोड मजुरांची अनोखी आनंदी दिवाळी साजरी झाल्याचा वेगळाच आनंद उपस्थितांना अनुभवायला मिळाला.
शिवनाकवाडीत ऊसतोड मजुरांना साहित्य वाटप करुन आनंदी दिवाळी साजरी
|