बातम्या
बालकल्याण संकुलातील बालकांसाठीचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
By nisha patil - 2/3/2024 12:41:25 PM
Share This News:
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व धर्मादाय रुग्णालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरातील जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना, बालकल्याण संकुल येथील बालकांच्या आरोग्य तपासणीसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन 29 फेब्रुवारी रोजी घेण्यात आले. या शिबीरात जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांनी सहभाग घेतला. या आरोग्य शिबीरामध्ये मुलांची आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधे देण्यात आली. यामध्ये मुलांचे डोळे, दात, नाक-कान घसा, त्वचारोग, स्त्री रोग व सामान्य आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार होत्या तर कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक धर्मादाय आयुक्त शरद वाळके यांनी केले होते. कार्यक्रमासाठी जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना, बालकल्याण संकुलचे उपाध्यक्ष व्ही.बी. पाटील, मानद कार्यवाह पद्मजा तिवले व कोल्हापूर जिल्हा ट्रस्ट प्रॉक्टीशनर बार आसोसीएशनचे सचिव अॅड. किर्तीकुमार शेंडगे उपस्थित होते. यावेळी बालसंकुलातील मुलांसाठी न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडुन धान्याचे वाटप करण्यात आले. बालसंकुलाच्या मागणीप्रमाणे यापुढील काळात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येईल, अशी हमी श्रीमती पवार यांनी दिली. कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा ट्रस्ट प्रॅक्टीशनर बार आसोसीएशनचे सहकार्य लाभले.
आरोग्य शिबीराच्या आयोजनासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातील अधिक्षक अरुण भुईकर, विशाल क्षीरसागर, राहुल पाटील, शिवराज नाईकवडे, महादेव जावळे व सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व बालकल्याण संकुलातील सर्व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
बालकल्याण संकुलातील बालकांसाठीचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
|