बातम्या
चीनमध्ये उष्णतेची लाट
By nisha patil - 6/23/2023 4:16:10 PM
Share This News:
बीजिंगने शुक्रवारी ‘रेड’ अॅलर्ट जारी केला असून त्यांच्या सिस्टममधील ही सर्वोच्च पातळी असल्याचं सांगण्यात आलं आहे. उष्ण हवामानाचा फटका चीनच्या अनेक भागांना बसला आहे.
काही दिवसांपूर्वीच चीनच्या राजधानीचं तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. गुरुवारी, शहरात पारा 41 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यानं जूनमधील नवा विक्रम नोंदवला गेला आहे.
बीजिंगच्या दक्षिण उपनगरातील हवामान केंद्रावर सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं आहे. या केंद्रात दुपारी 41.1 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. जूनमध्ये यापूर्वीचे सर्वोच्च तापमान 10 जून 1961 रोजी 40.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं होतं. गुरुवारचे कमाल तापमान शहराच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च तापमान असलं तरी, 24 जुलै 1999 रोजी बीजिंगमध्ये 41.9 अंश सेल्सिअस नोंदविलेल्या विक्रमापेक्षा ते कमी झाले.
चीन चार-स्तरीय हवामान चेतावणी प्रणाली वापरतो, ज्यामध्ये लाल सर्वात गंभीर आहे, त्यानंतर केशरी, पिवळा आणि निळा आहे. रेड अलर्ट म्हणजे 24 तासांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
पुढील आठ ते दहा दिवस देशाच्या उत्तरेकडील भागात कमाल तापमान कायम राहील, असं चीनच्या हवामान प्रशासनानं गुरुवारी सांगितलं. बीजिंग, टियांजिन, हेबेई, शेंडोंग, हेनान आणि इनर मंगोलियासह विविध ठिकाणी नोंदवण्यात आलेली निरीक्षणं आणि इशारे जाहीर करण्यात आले.
उत्तर चीनमधील बंदर शहर टियांजिनमध्ये गुरुवारी 41.2 अंश सेल्सिअस तापमानामुळे प्रचंड उष्मा अनुभवला. या तापमानानं स्थानिक विक्रम मोडित काढले.
हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकाळात नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्यास सांगितले आहे. रहिवाशांना दररोज किमान 1.5 लीटर पाणी पिण्याचा आणि अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.
चीनमध्ये उष्णतेची लाट
|