बातम्या

मुंबई, कोकणात मुसळधार

Heavy in Mumbai Konkan


By nisha patil - 1/7/2023 12:57:59 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :मराठवाडा कोरडाच, तुरळक ठिकाणी रिमझिम, पेरणी रखडली मुंबई : मुंबईत शुक्रवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर बांद्रापासून ते अगदी अंधेरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, कोकणातही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जगबुडीसह अन्य नद्याही दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. एकीकडे दमदार पाऊस सुरू असताना मराठवाडा मात्र, अद्याप कोरडाच आहे. काही ठिकाणी सर्वसाधारण पाऊस झाला. मात्र, आकाशात कोरडे ढगच फिरत आहेत. त्यामुळे पेरणी रखडली असून, शेतक-यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांची काम सुरू आहेत. त्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तसेच पावसामुळे सकाळपासूनच मुंबईची लाईफ लाईन धिम्या गतीने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला होता. तसेच एलबीएस रोड आणि सायन पनवेल मार्गावर वाहनचालकांना काही ठिकाणी वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागला. पश्चिम उपनगरात जोगेश्वरी, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, विलेपार्ले आणि वांद्रे परिसरातही जोरदार पाऊस झाला.
कोकणात जगबुडी नदीला पूरकोकणात रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. सह्याद्री खो-यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी जवळून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्राला उधाण आल्याने समुद्र किना-यावर कुणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


मुंबई, कोकणात मुसळधार