बातम्या
देशातील बहुतांश राज्यात मुसळधार पाऊस, उद्यापर्यंत जोर कायम राहणार
By nisha patil - 6/29/2023 12:55:23 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : देशातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. तर डोंगराळ भागात पावसामुळं नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशाच्या विविध भागात उद्यापर्यंत म्हणजे 30 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यानंतर पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.
चार जुलैपर्यंत दिल्लीत मुसळधार पावसाचा इशारा
देशाची राजधानी दिल्लीत जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज दिल्लीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. दिल्लीत चार जुलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशातही IMD 31 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे.
हिमाचलसह जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा कहर
हिमाचल प्रदेशात पावसाने कहर केला आहे. राज्यात सतलज नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. यामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडल्या आहेत. अनेक लोक बेघर झाले आहेत. तर शिमल्यात भूस्खलन होत आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तराखंडमध्ये आज हवामान विभागानं काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, केरळ आणि महाराष्ट्रात आज मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच मध्य प्रदेश आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, झारखंडमध्येही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महराष्ट्रातही जोरदार पाऊस
राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र दिसत आहे. राज्यात सुरु झालेल्या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील इतर भागातही चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
देशातील बहुतांश राज्यात मुसळधार पाऊस, उद्यापर्यंत जोर कायम राहणार
|