बातम्या
कोल्हापूर, सातारा पुण्यासह पाच जिल्ह्यात पुढील 12 तासांत जोरदार पावसाची शक्यता
By nisha patil - 2/10/2023 8:03:19 PM
Share This News:
पुढील 12 तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या कालावधीमध्ये कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पुणे तसेच घाट क्षेत्रांमध्ये काही ठिकाणी कमी वेळात जास्त पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे झाड उन्मळून पडणे, दरड कोसळणे, डोंगरांवरून माती वाहून येण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईपर्यंत प्रवास न करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून दरड कोसळून अपघात होण्याचे प्रमाण पावसाळ्यामध्ये सातत्याने वाढलं आहे. त्यामुळे प्रवास करताना काळजी घ्यावी असे आवाहनही करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. धरणांमध्ये पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. दुसरीकडे, आठवड्याच्या शेवटी मान्सून महाराष्ट्रातून एक्झिट घेणार आहे. 10 ऑक्टोबरनंतर मुंबईतून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. राज्यात पुढील काही दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज कायम आहे. राज्यातील नऊ जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट कायम आहे. राज्यात पालघर, मुंबई उपनगर, ठाणे आणि नांदेड जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सांगलीत 44 टक्के पावसाची तूट आहे. साताऱ्यात यंदा फक्त 535.6 मिमी पाऊस झाला आहे. सरासरी 844.6 मिमी पाऊस होत असतो.
जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरातील पाऊस त्याच्या दीर्घकालीन सरासरीच्या 94 टक्के होता, जो 2018 नंतरचा सर्वात कमी आहे, असे भारतीय हवामान विभाग ने एका निवेदनात म्हटले आहे. आयएमडीने एल निनोचा मर्यादित प्रभाव गृहीत धरून हंगामात 4 टक्के पावसाची तूट अपेक्षित धरली होती. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत देशात सामान्य पाऊस पडण्याची अपेक्षा आहे,
कोल्हापूर, सातारा पुण्यासह पाच जिल्ह्यात पुढील 12 तासांत जोरदार पावसाची शक्यता
|