बातम्या

राज्यात मुसळधार अवकाळी पाऊस अन् गारपीट

Heavy unseasonal rain and hail in the state


By nisha patil - 10/4/2024 12:51:37 PM
Share This News:



राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. नागपूरसह विदर्भाच्या काही भागात गेल्या २४ तासांत मुसळाधार अवकाळी पाऊस झाला. काही भागात गारपीट झाल्याने भाजीपाला आणि फळपिकांचं मोठं नुकसान झाले. विदर्भात नागपूर, अमरावती, अकोला व बुलढाणा शहरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने नुकसान झाले आहे.

संत्रा,कांदा, गहू पिकांचे नुकसान

अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. वरुड तालुक्यातही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यासह अनेक भागात पुन्हा गारपीटीसह वादळी वाऱ्याच्या अवकाळी पावसाचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे संत्रा,कांदा, गहू पिकासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामूळे चांदुर बाजार तालुक्यातील जमापूर आणि शिरजगाव बंड गावात घरांची मोठी पडझड झाली.

भंडारा, हिंगोलीत पाऊस

भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी रात्री विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, रात्रीच्या सुमारास आलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. परंतु शेती पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे.


राज्यात मुसळधार अवकाळी पाऊस अन् गारपीट