बातम्या

मुंबई शहरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान

Home voting of 543 senior citizens in both Lok Sabha constituencies of Mumbai city


By nisha patil - 5/16/2024 12:11:01 PM
Share This News:



भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये प्रथमच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार यांना टपाली मतदान पथकामार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये गृह मतदानाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ५४३ ज्येष्ठ नागरिक व ९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. 

            जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. यादव म्हणाले, टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास संबंधित ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांचा नमुना १२-ड अर्ज प्राप्त होणे आवश्यक होते. ३०-मुंबई दक्षिण मध्य विधानसभा मतदारसंघात अर्ज केलेल्या ३१० ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ०९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानाच्या सुविधेचा लाभ घेत टपाली मतपत्रिकेद्वारे घरून मतदान केले. ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात २३३ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी या सुविधेचा लाभ घेत घरून मतदान केले आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघात सोमवार (दि.१४ मे) पासून गृह मतदानास प्रारंभ करण्यात आला. त्या अनुषंगाने संबंधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विधानसभा मतदारसंघ निहाय २ टीमची नियुक्ती केली आहे. ही टीम मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेत आहे.

         ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघात ७७३ ज्येष्ठ नागरिक व ४८ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली असून ३०-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात ६०४ ज्येष्ठ नागरिक व २९ दिव्यांग मतदारांनी गृह मतदानासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती श्री. यादव यांनी दिली. 


मुंबई शहरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात ५४३ ज्येष्ठ नागरिकांचे गृह मतदान