बातम्या
पावसाळ्यातील साथींच्या आजारांचा सामना करण्यासाठी रुग्णालये सज्ज
By nisha patil - 6/29/2023 1:01:40 PM
Share This News:
काही दिवसांपासून मुंबईमध्ये सुरू झालेल्या पावसामुळे उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र पावसापाठाेपाठ हिवताप, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू यासारखे साथीचे आजारही उद्भवण्यास सुरुवात होते. या आजारांचा सामना करण्यासाठी मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये सज्ज झाली आहेत. मुंबईतील नायर, शीव, कूपर, जे.जे. आणि सेंट जॉर्जेस रुग्णालयांनी आवश्यक औषधे, इंजेक्शन याचबरोबर राखीव खाटा उपलब्ध केल्या आहेत. पावसाळ्यातील साथीच्या आजारांना रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी धुम्रफवारणी, कीटकनाशकांची फवारणी, नागरिकांची घरे व घरांच्या आसपासची असलेली डासांची उत्पत्तीस्थाने शोधून नष्ट केली जातात. तसेच वाढत्या साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी मुंबईतील रुग्णालये सज्ज झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयामध्ये पावसाळी आजारांसाठी १ जूनपासून सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभाग सुरू केला आहे. येथे रुग्णांच्या सर्व तपासण्या करून त्यांना २ तासांत अहवाल दिले जातात. पुरुष कक्षासाठी १५२ खाटा, स्त्री कक्षासाठी १३९ खाटा, अतिदक्षता विभाग २२ खाटा, बालरुग्ण विभाग ९० खाटा, बालरोग अतिदक्षता ७ खाटा, हाय डिपेंडेन्सी युनिट १५ खाटा, हिमो डायलिसिस ३ खाटा आणि १४० जीवन रक्षक प्रणाली उपलब्ध ठेवल्या असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी दिली. कूपर रुग्णालयामध्ये हिवताप, डेंग्यू यासह अन्य आजारांना रोखण्यासाठी आवश्यक सर्व औषधांचा साठा आणि तपासणी किट उपलब्ध ठेवले आहेत. तसेच ३० ते ४० खाटा राखीव ठेवल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक सर्वसामान्य रुग्णालयामध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू केला आहे. या रुग्णांसाठी दोन कक्ष सज्ज ठेवले असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली. जे.जे. रुग्णालयामध्ये रक्त तपासण्या करण्यावर भर दिला आहे. बाह्यरुग्णात येणाऱ्या संशयित रुग्णाची तातडीने हिवताप, डेेंग्यूच्या रक्ततपासणी करण्यात येते. त्यासाठी आवश्यक किट उपलब्ध ठेवले आहेत. रुग्णांसाठी आवश्यक खाटा उपलब्ध असून, रुग्णसंख्या वाढल्यास अन्य कक्षांमध्येही खाटा उपलब्ध करण्यात येतील, असे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सांगितले. सेंट जॉर्जेस रुग्णालयानेही साथीच्या आजारांचा सामना करण्यासाठी सज्जता ठेवली आहे. रुग्णालयामध्ये आवश्यक औषधे, इंजेक्शनचा साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. तसेच रुग्णांची संख्या वाढल्यास स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नकावातावणातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यासारख्या आजारांमध्ये काही अंशी वाढ हाेत आहे. पावसाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन आजार वेगाने फैलावतात. हा फैलाव रोखण्यासाठी योग्य काळजी घेण्याबरोबरच पाैष्टिक आहारावर भर देणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत, असा सल्ला इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी दिला.
पावसाळ्यातील साथींच्या आजारांचा सामना करण्यासाठी रुग्णालये सज्ज
|