बातम्या
चहा कसा प्यावा?
By nisha patil - 2/4/2024 7:23:56 AM
Share This News:
चहा म्हणजे सगळ्यांचा जिवाभावाचा सखाच जणू! माझ्या रोजच्या प्रॅक्टिसमध्ये विविध प्रकारचे लोक बघायला मिळतात. त्यांची खाण्यापिण्याची हिस्ट्री घेणं मला आवडतं, कारण त्यातून मला खूप शिकायला मिळतं. या वेगवेगळ्या सवयी आपल्या स्वास्थ्यावर कसा परिणाम करतात ते अभ्यासायला मिळतं. दिवसातून अगदी छोटा एखादं दुसरा कप चहा पिणारे ते दिवसाला तीस कप चहा रिचवणारेही बघायला मिळतात. आपण चहा का पितो? तो तब्येतीला चांगला की वाईट? किती चहा प्यायला परवानगी असते? चहा दुधाचा प्यावा की कोरा, हे असे अनेक प्रश्न चहाशी निगडित आहेत. याची उत्तरं मिळाली की चहा आरोग्यासाठी चांगला की वाईट याचं उत्तर सहज मिळू शकतं.
चहाची पानं आणि पावडर.
शास्त्नीयदृष्ट्या पाहायचं झालं तर चहा म्हणजे गरम पाण्यात कॅमेलिया सिनेन्सिस या वनस्पतीची कोवळी, हिरवी पानं टाकून बनवलेलं पेय होय. याचा विशिष्ट स्वाद आणि सुगंध तसंच तरतरी देणारा गुणधर्म लोकांना आकृष्ट करून वारंवार पिण्यास भाग पाडतो.
कमी प्रमाणात चहा प्यायल्यास त्यातील अँण्टीऑक्सिडण्ट गुणधर्म शरीराला उपयोगी पडतो. शरीरातील विषार किंवा टॉक्सिन्स त्यामुळे निघून जाण्यास मदत होते.
ताज्या तोडलेल्या चहाच्या पानांमध्ये कॅटेचीन हे चांगलं उपयोगी तत्त्व 30 टक्के इतकं असतं; पण पानं वाळवून त्याची पत्ती बनवेपर्यंत हे प्रमाण कमी होत जातं. ज्या विशिष्ट गुणामुळे आपण चहा पितो तो महत्त्वाचा गुण म्हणजे लगेच तरतरी वाटण्याचा किंवा ऊर्जा मिळण्याचा! त्यासाठी त्यातील कॅफेन आणि थियानिन ही उत्तेजक द्रव्यं 3 टक्क्यांपर्यंत असतात. यात अगदी कमी प्रमाणात कर्बोदकं आणि प्रथिनं असतात.
चहा आणि त्रास.
आयुर्वेदाच्या दृष्टीनं बघायचं झाल्यास नुसता चहा हा चवीला तुरट, कडवट लागतो त्यामुळे ब-याच जणांना चहा आणि तोही विशेषत: ब्लॅक टी प्यायल्यास पित्त होतं, जळजळ होते. दिवसातून जास्त वेळा चहा पिणं, अगदी गरम पिणं, भूक लागलेली असताना किंवा उपाशीपोटी चहा घेणं, रात्री किंवा वेळी-अवेळी चहा पिणं या कारणांनी तो निश्चितच पित्त वाढवतो आणि त्रासदायक ठरतो. अशा अनियंत्रित चहा सेवनानं अल्सरसुद्धा होतो. स्थूलता असणा-या व्यक्तींनी वारंवार भरपूर साखर आणि दूध घालून चहा प्यायला तर वजन अधिकच वाढतं.
स्वत: चहा फार उष्ण किंवा थंड गुणाचा नाही; पण आपण इतर ज्या गोष्टी चव वाढविण्यासाठी वापरतो त्यामुळे तो बरेचदा उष्ण होतो. आलं, गवती चहा, सुंठ, तुळस किंवा दालचिनी, मिरे टाकून बनवलेला चहाचा मसाला यामुळे तो पित्त वाढवतो.
चहा प्रकृतीनुसारा प्यावा.
आपल्या प्रकृतीनुसार चहा किती प्रमाणात आणि कशा प्रकारचा चालेल हे अवलंबून आहे. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी वारंवार आणि खूप उकळलेला, आलं, गवती चहा वगैरे टाकलेला चहा प्यायला तर त्यांना तो सहन होत नाही. जिभेला फोड येणं, घशात आग होणं या तक्रारी जाणवू शकतात. चहा अगदी गरम गरम प्यायला तरी यांना त्रास होतो.
कफ प्रकृतीच्या व्यक्तींना उष्ण, तीक्ष्ण पदार्थांनी काही त्रास होत नाही. कारण त्यांची स्वत:ची प्रकृती थंड असते. यांना अगदी नुकताच गाळलेला गरम चहा, त्यात तीक्ष्ण मसाले असले तरी तापदायक होत नाही.
वात प्रकृतीच्या व्यक्तींनाही गरम पदार्थ चालतात त्यामुळे गरम मसाला चहा यांना चालतो; पण मूळ स्वभाव चंचल आणि शिस्त कमी असल्यानं कधी चहा सोडून देतात, तर कधी भरपूर, वारंवार चहा पीत राहातात.
हानिकारक की फायद्याचा?
नुसता उकळलेला आणि कोरा, काळा, बिनदुधाचा चहा जास्त हानिकारक आहे. चहा खूप उकळला की त्याचे फायदे कमी होऊन त्रास वाढू लागतात. त्यामुळे थोडं दूध, थोडी साखर आणि थोडी चहा पावडर असा चहा प्यावा. म्हणजे पाणी उकळलं की साखर टाकून मग चहा टाकला की फार न उकळता लगेच दूध घालून गॅस बंद करावा. नाहीतर चहा गाळून त्यात वरून दूध घालावं. खरा गुणकारी चहा म्हणजे टी बॅग्स वापरून गरम पाण्यात सात आठ वेळा बुडवून केलेला सौम्य चहा! चहाची पावडर जितकी जाड तितका तो पथ्यकर! डस्ट प्रकारात मोडणारे अगदी बारीक पावडर स्वरूपातील चहा पाण्यात खूप उकळला की अतिशय स्ट्रॉंग, उग्र चहा तयार होतो. काहींना असाच चहा प्यायला की तल्लफ भागते, पण ते चुकीचं आहे.
दिवसातून दोनदा चहा पिणं ही पद्धत आपल्याकडे ब-यापैकी रूढ आहे आणि ती ठीक आहे; पण दर काही तासांनी चहा पिणं नक्कीच चुकीचं आहे. ग्रीन टी किंवा हर्बल टी घेणं आरोग्यासाठी हितकारक आहे.
चहा पिण्याचे नियम.
चहा एकदा केल्यावर तो दहा मिनिटांच्या आत प्यावा. ब-याच घरांमधून अनेक सदस्य असतील तर चहा वारंवार करायला लागू नये म्हणून सकाळी लवकर कोणीतरी एकदाच पातेलंभर चहा उकळून ठेवतात. काही ठिकाणी तो काळाच ठेवतात आणि मग जेव्हा जो उठेल तो आपल्या आवडीनुसार दूध घालून तो चहा कितीही वेळानं पितात. काही ठिकाणी तर दूध घालून तयार केलेला चहा पुढे तीन-चार तास वारंवार गरम करून प्यायला जातो. तसेच गाळताना त्या चहा पत्तीमध्ये अगदी एकही थेंब दूध, पाणी राहणार नाही अशा पद्धतीनं दाबून दाबून गाळून घेतात. हेही चुकीचं आहे.
सौम्य स्वरूपाचा आणि कमी प्रमाणात चहा घेतला तर तो उत्तम गुणकारी ठरतो. चहाची पावडर कपात घेऊन त्यावर कडकडीत उकळलेलं पाणी टाकलं की त्यातील सुगंधी द्रव्य सुटं होतं आणि गुणकारी ठरतं. ब्रिटिश भारत सोडून गेले त्याला सत्तर वर्षं होऊन गेली; पण जाताना भारतीयांना चहाची सवय लावून गेले. ही चहा पिण्याची सवय तशीच राहू द्यायची असेल तर निदान त्यांच्याच पद्धतीनं केलेला सौम्य चहा प्यावा म्हणजे त्याचे फायदे तरी मिळतील.
चहा कसा प्यावा?
|