बातम्या

पावसाळ्यात आजार होऊ नये यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

How to take care of health to prevent illness during monsoon


By nisha patil - 7/15/2023 7:29:20 AM
Share This News:



 पावसाळ्यात आजार होऊ नये यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी? 

निसर्गाची किमया प्रत्येक ऋतूमध्ये निरनिराळी असते. थंडीच्या दिवसांत होणारी हुडहुडी असो किंवा उन्हाळ्यात सकाळी सकाळी पडणाऱ्या कोवळ्या ऊन्हानंतर बसणारा उन्हाचा असह्य तडाखा, या गोष्टी अगदी परस्पर विरोधी असल्यातरी आपल्यासाठी आवश्‍यक असतात.

आता सुरू झालेला पावसाळा हाही त्याला अपवाद नाही.

मानवाच्या मूलभूत गरजांपैकी अत्यावश्‍यक गोष्ट म्हणजे पाणी. आपल्याला पाणी मुबलक प्रमाणात पुरवणारा ऋतू म्हणजे पावसाळा. निसर्गाच्या या खेळात आपण निरोगी राहण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्‍ती ही नैसर्गिक तरतूद आपल्या प्रत्येकाकडे असते. मात्र कोणत्याही कारणाने ही प्रतिकारशक्‍ती कमी पडू लागली की हळूहळू तब्येतीच्या बारीक सारीक तक्रारी सुरू होऊ लागतात. त्यापैकी एक महत्त्वाची तक्रार म्हणजे श्‍वसन संस्थेची तक्रार.

साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी पन्नाशीच्या दरम्यानची एक महिला कंबरदुखी, झोप शांत होत नाही आणि जेवण म्हणावे तसे जात नाही, त्यामुळे थोडा अशक्‍तपणा वाटतो. अशा काहीशा किरकोळ वाटणाऱ्या निरनिराळ्या तक्रारी घेऊन आली होती. तिचा पूर्व इतिहास जाणून घेताना ही गोष्ट लक्षात आली की पूर्वी तिला बालदमा होता. आता त्याचा इतका काही त्रास होत नाही;

पण पावसाळ्यात किंवा थंड हवेमध्ये जास्त वेळ राहिल्यास तिला खोकला सुरू होतो आणि श्‍वास घेण्यास काहीशा प्रमाणात त्रास होऊ लागतो. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे अशावेळी योग्य काळजी न घेता हलगर्जीपणा झाल्यास त्रास हमखास बळावतो. त्या महिलेच्या सांगण्यानुसार थंडीच्या आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे थंड अथवा तळकट असे त्रास होणारे पदार्थ ती टाळतच होती.

दुर्लक्ष केले नाही तर त्रासही होत नाही असे तिचे म्हणणे होते. एकंदर तक्रारी समजून घेऊन त्यांच्याकरीता होमिओपॅथीक औषधांची योग्य प्रमाणात मात्रा दिली. पंधरा दिवसांनी तिला बोलावले. या दरम्यान होमिओपॅथीक औषधांचा योग्य असा परिणाम तिच्यावर दिसून आला होता. तिची कंबरदुखी बऱ्यापैकी कमी झाली होती. झोपही शांतपणे लागायला सुरू होऊन जेवणही सुधारले होते. थोडक्‍यात, तक्रारी कमी होऊन तिला तरतरी वाटू लागली होती. परिणामी होमिओपॅथीक वैद्यक शास्त्रावर असणारा तिचा विश्‍वास वृद्धिंगत झाला होता. तिच्या म्हणण्यानुसार आता तिला कोणतीही तक्रार जाणवत नव्हती.

मात्र तिला एक शंका होती, ती म्हणजे, तिला एका महिन्यानी सहलीसाठी जायचे होते आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तिला खोकल्याचा तसेच श्‍वासाचा त्रास होत असे. सहलीच्या ठिकाणी पाऊस आणि थंड हवा असणारच होती. सहलीसाठी जाणे ती टाळू शकत नव्हती. सहलीच्या ठिकाणी गेल्यावर कोणताही त्रास उद्‌भवू नये यासाठी तिला आतापासूनच काही होमिओपॅथीक औषधे सुरू करता येतील का, असे ती विचारत होती.

तिची शंका अगदी रास्त होती. वयोमानानुसार म्हणा किंवा आधीच्या तक्रारींचा परिणाम यामुळे तिची प्रतिकरशक्‍ती कमी झाली होती. तिचे दैनंदिन व्यवहार अगदी सुरळीत चालू होते. परंतु पुढे होणारा त्रास वाचवण्यासाठी आधीच घेतलेली काळजी नेहमीच मोलाची ठरणार होती. म्हणूनच हाताशी असणाऱ्या एक महिन्याच्या कालावधीचा योग्य वापर करून घेण्याचे सांगितले. प्रतिकारशक्‍ती वाढवण्यासाठी आणि पुढे कोणताही त्रास होऊ नये यासाठी होमिओपॅथीक औषधांबरोबर योगासनाचा क्‍लास सुरू करण्याचे सुचवले.

अचूक होमिओपॅथीक औषधे आणि योगासने यांचा योग्य मेळ बसवल्यास प्रतिकारशक्‍ती वाढण्यास निश्‍चितपणे मदतच होईल. परिणामी एकंदर आरोग्य निरोगी राखण्यास याचा फायदा कसा होऊ शकतो हे तिला समजावून सांगितले. तिच्या तक्रारींकरीता आणि संपूर्ण स्वास्थ्याकरिता सुचवलेला उपाय सुयोग्य परिमाण देईल याची खात्री पटल्यावर तिने औषधे आणि योगासने सुरू केली. एक महिना अगदी न चुकता व्यवस्थित सर्व गोष्टींचे तिने पालन केले. एक महिन्यानंतर प्रवासाला जाण्याआधी आवश्‍यक असणारी होमिओपॅथीक औषधेही ती बरोबर घेऊन गेली.

सहलीहून परतल्यावर पंधरा दिवसांनी ती पुन्हा क्‍लिनिकमध्ये आली. तिच्या सांगण्यानुसार थंड आणि पावसाळी ऋतूतील सहल विनातक्रार पार पडली होती. हे ती अतिशय आनंदाने सांगत होती.एकूण काय, तिला मिळालेला आनंद वैयक्‍तिक होमिओपॅथीक औषधे आणि वैयक्‍तिकरित्या करून घेतली जाणारी योगासने आणि व्यायाम यांच्या योग्य समन्वयाचा हा चांगला परिणाम होता, यात संदेह नाही.


पावसाळ्यात आजार होऊ नये यासाठी आरोग्याची काळजी कशी घ्यावी?