बातम्या
पावसाळ्यात स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल?
By nisha patil - 2/7/2023 7:25:34 AM
Share This News:
आयुर्वेदात सहा ऋतूंचे वर्णन केलेले आहे. शिशिर, वसंत, ग्रीष्म,वर्षा, शरद व हेमंत. ग्रीष्म(उन्हाळा) ऋतुनंतर येणारा वर्षा ऋतु हा सर्वप्रकारे ग्रीष्माच्या विपरीत असतो.
ग्रीष्मातील सर्वांगाची लाही लाही करणारी उष्णता थंडाव्यात बदलते, हवेतील रुक्षतेच्या जागी आता आर्द्रता आपली उपस्थीती दाखवु लागते. वातावरण शीत व उल्हासित करणारे होते. सुरुवातीला हवाहवासा वाटणारा हा ऋतु चांगल्या बदलांसोबत काही वाईट बदल देखिल सोबत घेऊन येतो व यामुळे नंतर मात्र शरीरबल कमी करुन व्याधी उत्पन्न होण्यास अनुकुल ठरतो.
हवेतील आर्द्रता व सूर्यकिरणांचा अभाव हा जीवाणु, विषाणुंच्या वाढीसाठी पोषक असतो. यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढु लागते. परंतु आयुर्वेदाने हजारो वर्षांपुर्वी या ऋतुतील बदलांविरुद्ध राहणीमान व आहार कसे बदलायचे याचे वर्णन करुन ठेवले आहे. वर्षाऋतु हा उत्तरायणामधे येणारा ऋतु असुन या काळात शरीर बल हे कमी असते. तसेच जाठरग्नि मंद झाल्यामुळे पचन शक्ती देखिल मंदावते. यामुळेच रोगप्रतिकार शक्ती देखिल कमी होते.
हा काळ वात दोषाच्या प्रकोपाचा असुन या काळात शरीरातील वात वाढतो व तो वातविकारांना वाढवतो किंवा उत्पन्न करतो. पचनशक्ती कमी झाल्याने पचनाचे विकार बळावतात. वात प्रकोपास पोषक वातवरण असल्यामुळे वाढलेला वात हा संधीवात, आमवात, दमा, मणक्यांचे विकार, ज्वर, त्वचाविकार अशा आजारांना उत्पन्न करतो. तसेच या काळातील दुषित पाण्यामुळे देखिल अतिसार, काविळ, त्वचाविकार, मलेरिया, टायफॉइड असे विकार उत्पन्न होतात.
यासाठी हे सर्व टाळण्यासाठी व वर्षा ऋतुमधे देखिल आरोग्य चांगले राहण्यासाठी आयुर्वेद ग्रंथांमधे विशिष्ट आहार व राहणीमान ( ऋतुचर्या) यांचे पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
वर्षा ऋतूमधे आहार पद्धती -:
– आहार हा ताजा व गरम सेवन करावा, फ्रीज मधील पदार्थ, पेय व भाज्या खाणे टाळावे. त्याने या ऋतुमधे वात व कफ वाढुन वात विकार तसेच सर्दी चटकन होते.
– वेगवेगळ्या डाळींचे किंवा मांस पदार्थांचे युष ( सुप) हे पाचक व जाठराग्निवर्धक असल्याने त्यांचे सेवन करावे. वातवर्धक आहार टाळावा. कटु (तिखट),तिक्त(कडू),कषाय(तुरट) चवीचे पदार्थ या ऋतुत कमी प्रमाणात सेवन करावेत.
– हलके मसाले जसे लसुन, आले, हींग, हळद, मिरे यांच्यासारख्या मधुर, अम्ल, लवण (खारट) रस युक्त पदार्थांचा सुयोग्य वापर आहारात करावा.
पावसाळ्यातील आहार आणि पथ्ये-:
– आहारात पचण्यास हलक्या व ताज्या पदार्थांचा समावेश करावा, यात तांदुळ, गहु तसेच विविध डाळी भाजुन यांपासुन वेगवेगळे आहार पदार्थ बनवुन त्याचे सेवन करावे.
– या ऋतुमधे मांसाहार टाळावा व मासे तर पुर्णपणे टाळावेत कारण पचनशक्ती मंद असते तसेच मांस देखिल दुषित असण्याची संभावना अधिक असते, यामुळेच या कालावधीत श्रावण किंवा चातुर्मासाचे पालन केले जाते.
– हिरव्या पालेभाज्या या ऋतुमधे दुषित असतात व त्यावर जीवाणु, विषाणुंची अतिरिक्त वाढ होत असते, त्यावर अळ्या व लार्वा यांचीही वाढ होत असते तसेच या कालावधित असा भाजीपाला वातवर्धक असतो त्यामुळे तो कमी खावा व खाताना स्वच्छतेची चांगली काळजी घ्यावी.
– या कालावधीत बाहेरचे तळलेले व चमचमीत खाद्य पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते परंतु त्याने पचनाचे व इतर आजार वाढु शकतात त्यामुळे भजी, वडापाव, चाट असे पदार्थ टाळलेले जास्त चांगले.
पावसाळ्यातील जीवनशैली -:
– या ऋतुमधे जास्त पावसात जाणे टाळावे जाणे झालेच तर छत्री/ रेन कोट यांचा वापर करावा घरी परत आल्यावर अंग व केस पुर्ण कोरडे करावे, पावसात अधिक भिजणे टाळावे.
– कपडे योग्य न सुकल्यामुळे बऱ्याचदा त्यात आर्द्रता असते व असे कपडे परीधान केल्यास त्वचा विकार होण्याचा संभव असतो त्यामुळे परीधान करावयाचे सर्व बाह्य व अंतर्वस्त्र चांगले सुकवुन मगच वापरावेत.
– दिवसा झोपणे टाळावे. दिवसा घेतलेली झोप कफवर्धक असते व ती वर्षा ऋतुत कमी झालेली पचनशक्ती अजुन कमी करण्यास मदत करते.
– घरातील वातावरण स्वच्छ व कोरडे ठेवावे, आजुबाजुस पाणी जास्त काळ जमा होऊ देऊ नये. घरामधे अगरु, गुग्गुळ, चंदन, कापूर यांचे धूपण केल्यास जंतुसंसर्ग कमी होतो व वातवरण सुगंधी व आल्हाददायक राहते. आजुबाजुचा परीसर स्वच्छ ठेवुन डासांच्या उत्पत्तीस प्रतिबंध घालावा.
-अभ्यंग्यमाचरेन्नित्यं, स जराश्रमवातहा ।
स्नानापुर्वी शरीरास कोमट तेलाने अभ्यंग करने वातनाशक आहे त्यामुळे या दिवसांत तीळ तेलाने अभ्यंग करावे.
– या ऋतुमधे प्रकुपित झालेल्या वाताच्या चिकित्सेसाठी बस्ती या पंचकर्माचे वर्णन आयुर्वेद ग्रंथांमधे केले आहे. पक्वाशय हे वाताचे मुल स्थान सांगितले आहे.बस्ती ही वाताची उत्तम चिकित्सा असुन याने वाताची अर्धी चिकित्सा त्वरीत होते यामुळे या ऋतुत बस्ती हे पंचकर्म करुन घ्यावे.
– जास्त शारीरीक श्रम करणे टाळावे, रात्री जागरण करु नये. तसेच मद्यपान टाळावे असे वर्णन आयुर्वेद ग्रंथामधे आहे.
वर्षा ऋतु हा आजार होण्यास पोषक ऋतु असल्याने सर्वात जास्त साथीचे किंवा संसर्गजन्य आजार या दरम्यान होतात योग्य ऋतुचर्या पाळल्यास व योग्य काळजी घेतल्यास आजारांचा हा ऋतु आनंदी, आल्हाददायक व निरोगी होवून जाईल.
पावसाळ्यात स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल?
|