बातम्या
सकाळी हुडहुडी तर दुपारी घामाच्या धारा!
By nisha patil - 1/16/2024 7:25:59 AM
Share This News:
सध्या वातावरणात सतत बदल होत आहेत. सकाळी थंडी तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.
या वातावरणात अंगदुखी, उत्साह नसल्यासारखे वाटणे, डोके दुखणे असे अनेक आजार उद्भवतात. अचानक वाढलेला उष्मा आणि थंडी आरोग्याला बाधक ठरत आहे. या आजारांवर वेळीच उपाय केले नाहीत तर ते बळवण्याची शक्यता असते. या बदलत्या वातावरणात कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या...
हवामानातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप अशा आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णालये तुडुंब भरली आहेत. याशिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे ऋतूतील बदलांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
हिवाळ्यात थंड हवेमुळे हवेत धूळ जास्त असते. या धुळीमुळे श्वसनाचे विविध आजार होतात. प्रामुख्याने दम्याच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णांनी उष्ण वातावरणातून थंड वातावरणात जाताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच थंड हवेशी संपर्क आल्यामुळे, खूप थंड पाणी पिणे किंवा सकाळी चालणे, थंड पाण्याने आंघोळ केल्याने दम्याचा झटका येऊ शकतो. दम्याचा त्रास असलेल्या लोकांना हिवाळ्यात सर्दीसारखा आजार होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. मधुमेह आणि किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी थंड ठिकाणी फिरणे किंवा थंड पदार्थ खाणे टाळावे. या काळात पाय दुखू लागल्याने वृद्धांच्या समस्या वाढतात. बदलत्या वातावरणाचा परिणाम वृद्ध गट आणि लहान मुलांमध्ये अधिक दिसून येतो.
अशी घ्या स्वतःची काळजी
हिवाळ्यात थंडीमुळे अनेकजण पाणी कमी पितात. मात्र, उन्हाळा सुरू झाल्याने तापमानात वाढ होते. त्याचप्रमाणे शरीराचे तापमान वाढल्यामुळे तुम्हाला अनेक वेळा थकवा जाणवू शकतो. उन्हाळ्यात तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते, त्यामुळे भरपूर पाणी प्या. मात्र पाणी एकदम पिऊ नका.
आहार असा घ्या
शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी नियमित आहारासोबतच ताजी फळे खा. यामध्ये टरबूज, खरबूज, द्राक्षे, काकडी, आंबा, काकडी इत्यादी खाद्यपदार्थांचा समावेश करावा. याशिवाय दही आणि ताकाचे सेवन करावे. उष्ण पदार्थांचे सेवन टाळा. तसेच उन्हाळ्यात थंड पेय पिणे टाळा. कोल्ड्रिंक्सऐवजी लिंबाचा रस आणि लिंबू पाणी प्या.
उन्हापासून असे करा स्वतःचे रक्षण
उन्हाळा सुरू झाल्यामुळे शक्यतो दुपारपर्यंत सर्व कामे उरकून घ्यावीत. दुपारी घराबाहेर पडणे टाळा. जर घराबाहेर पडणार असाल तर गॉगल, टोपी, रुमाल किंवा छत्रीचा आधार घ्या.
ऋतूतील बदलामुळे सर्दी, खोकला, उष्णता यांसारख्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी सामान्य रुग्णालयात ओपीडीमध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ऋतू बदलत असताना प्रत्येकाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक आहार घ्यावा. थंडीपासून स्वत: चे रक्षण केले पाहिजे आणि दुपारचा उन्हापासून स्वतःचे रक्षण केले पाहिजे.
सकाळी हुडहुडी तर दुपारी घामाच्या धारा!
|