बातम्या

पराभवाने खचणारा मी माणूस नाही. : राजू शेट्टी

I m not a man who gets tired of defeat Raju Shetty


By nisha patil - 6/22/2024 7:07:43 PM
Share This News:



 पराभवाने खचणारा मी माणूस नाही. शेतकरी चळवळ हा माझा आत्मा आहे. मी कष्टकर्यांमागे सावली प्रमाणे असून त्यांच्या न्याय प्रश्नासाठी मी सदैव लढत राहिन. निवडणूक लढवणे हे माझे साध्य नाही. आम्ही फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभारी घेऊ, आमचे काय चुकलयं यावर मंथन करून पुढील राजकीय दिशा ठरवू, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले. ते बारामती येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत केले. 
     

आज बारामती येथे दोन दिवशीय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीस सुरूवात झाली. यावेळी सतिश काकडे अध्यक्षस्थानी होते.यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, शेतकर्यांचे प्रश्न अजून मिटले नाहीत. राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणाने हा पिचलेला आहे. दिवसा विजेची मागणी आम्ही कित्येक दिवसापासून मागत आहोत. तरीदेखील सरकार द्यायला तयार नाही. धरणे आमची, जमिनी आमच्या, पाणी देखील आमचेच मग आमच्या शेतीला वीज द्यायला हाताला लकवा मारलाय काय?
 उसाच्या एफआरपीचा कायदा महाविकास आघाडी सरकारने मोडित काढला.भूमिअधिग्रहण कायद्यात बदल करून शेतकर्यांवर वरवंटा फिरवला. उसाची हजारो कोटी रूपयांची एफआरपी थकवली गेली. सोयाबिन कापसाला भाव नाही. शेतीमालाला भाव नाही. कांद्याला  व दुधाला भाव नाही. शेतकर्यांवर कर्जाचा डोंगर उभा आहे. शेतकर्यांच्या मुलांची लग्ने होत नाहीत.  शेतकर्यांच्या जमिनी विकासाच्या नावाखाली लुटल्या जात आहेत. बेरोजगारांचे लोंढे शहराकडे जात आहेत. तरूणांना जाती धर्माच्या नावाखाली भडकवले जात आहेत. शेतकर्यांना विजेची वाढीव बिले दिली गेली. अनेकांची विजेचे कनेक्शन कापण्यात आले. असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे आहेत. तरीदेखील उद्योगपतींनाच न्याय दिला जातो. सामान्यांना न्याय दिला जात नाही. 
लोकसभेच्या निवडणुका वेगळ्याच मुद्द्यावर लढवल्या गेल्या. पक्षफोडीचा मुद्दा ऐरणीवर आणून  मूळ प्रश्न बाजूला केले.  गद्दार, निष्ठावतं पासून मोदी पाहिजे विरूध्द मोदी नको, अशा लढती झाल्या.  जाती धर्मावर निवडणुका लढवल्या गेल्या. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर निवडणुका लढवल्या गेल्या नाहीत. पैशांच्या राशीच्या राशी वाटल्या गेल्या. पैसा व सत्ता संपत्तीचा वापर करून लोकसभेत अप्रचार करण्यात आला.  निवडणुका हा काय आमचा धंदा नाही. आमच्याकडे  भलेही पैसे नसतील. पण माझ्यावर मरमिटणारे हजारो कार्यकर्ते आहेत. 

राज्यातील शेतकर्यांना मी वार्यावर सोडणार नाही. विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात दि. 23 जूनच्या सत्रात घेऊ. राज्यभरातील शेतकरी चळवळ अधिक जोमाने पुढे चालवू. मी न थकणारा न थांबणारा आहे, चळवळ ही चालूच राहिल. 

यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील, संदीप जगताप, प्रकाश पोपळे, राजेंद्र गड्ड्यान्नावर, प्रकाश बालवाडकर, अनिल पवार, अमर कदम, दामोदर इंगोले, किशोर ढगे, प्रशांत डिक्कर, प्रभाकर बांगर आदी उपस्थित होते.


पराभवाने खचणारा मी माणूस नाही. : राजू शेट्टी