बातम्या
इचलकरंजीत श्रीरामल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी शोभायात्रा
By nisha patil - 1/18/2024 11:49:42 AM
Share This News:
इचलकरंजीत श्रीरामल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी शोभायात्रा
इचलकरंजी : प्रतिनिधी अयोध्या येथे संपन्न होत असलेल्या भव्यदिव्य अशा श्रीरामल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे रविवार 21 जानेवारी रोजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळामारुती आरती भक्त मंडळाच्या वतीने भव्य अशी शोभायात्रा व पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
रामजन्मभूमी अयोध्या येथे 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यामुळे संपूर्ण देश राममय झाला आहे. यानिमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांचे मार्गदर्शन व सहकार्याने इचलकरंजी येथील श्री काळामारुती आरती भक्त मंडळाच्या वतीने शोभायात्रा व पालखी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री काळा मारुती मंदिर (आयजीएम परिसर) येथे आरती व पालखी पुजन होऊन शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर ही शोभायात्रा आ. रा. पाटील शाळा, काजवे हॉस्पिटल, श्री शिवतीर्थ, कॉ. मलाबादे चौक, महात्मा गांधी पुतळा, झेंडा चौक, गुजरी कॉर्नर मार्गे गावभागातील राम जानकी मंदिर येथे आल्यानंतर शोभायात्रेची सांगता होईल. यावेळी रामजानकी मंदिर येथे महाआरती करण्यात येणार आहे.
या शोभायात्रा व पालखी मिरवणूकीत झांजपथक, लेझीम पथकल धनगरी ढोलसह विविध प्रकारच्या पारंपारिक वाद्यांचा समावेश असणार आहे. त्याचबरोबर राम-लक्ष्मण-सिता यांची वेशभूषा, भव्य रथ असणार आहे. तर शोभायात्रा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळी रेखाटली जाणार आहे. या भव्यदिव्य शोभायात्रेत इचलकरंजी शहर व परिसरासह सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
इचलकरंजीत श्रीरामल्ला मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी शोभायात्रा
|