बातम्या
इचलकरंजीत आज मराठा आरक्षणासाठी लाक्षणिक उपोषण
By nisha patil - 10/30/2023 7:17:39 AM
Share This News:
इचलकरंजीत आज मराठा आरक्षणासाठी लाक्षणिक उपोषण
सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय
इचलकरंजी : प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळावे ,या मागणीसाठी अंतरावली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला इचलकरंजीतील सकल मराठा समाजातर्फे पाठिंबा देण्यात आला. तसेच यासाठी उद्या सोमवार दि.30 ऑक्टोबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय आज झालेल्या समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
येथील शिवाजी उद्यानात झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीला मराठा समाजातील सर्वच पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये सर्वांनी आपली मते मांडली. त्यानंतर बैठकीत एकमताने काही निर्णय घेण्यात आले. यामध्ये मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू
केलेल्या आंदोलनास सकल मराठा समाजाने जाहीर पाठिंबा दिला. तसेच उद्या सोमवार दि.30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रांत कार्यालय चौकात लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषण आंदोलनात शहरातील मराठा समाजातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिका-यांना निवेदन देण्यात येणार आहे.याशिवाय शहर व परिसरात राजकीय नेत्यांनी आपले सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नयेत. घेतल्यास कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा समाजाच्या वतीने देण्यात आला. या बैठकीत मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला विरोध करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांचा निषेध करण्यात आला. संविधानिक पदावर असणाऱ्या खासदार, आमदार, मंत्री यांना गाव बंदी तसेच आंदोलनात व्यसपीठावर प्रवेश करण्यास मज्जाव करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
इचलकरंजीत आज मराठा आरक्षणासाठी लाक्षणिक उपोषण
|