बातम्या
सतेज पाटलांमध्ये हिम्मत असेल तर स्वतः समोर येऊन उत्तर द्यावं - शौमिका महाडिक
By nisha patil - 1/8/2023 11:24:42 PM
Share This News:
सतेज पाटलांमध्ये हिम्मत असेल तर स्वतः समोर येऊन उत्तर द्यावं - शौमिका महाडिक
काल वृत्तपत्रांच्या माध्यमातून संघाचे नेते घटलेले संकलन आणि विक्री याबाबत चिंता व्यक्त करत असल्याचे वाचण्यात आले. आज तेच लोक संघ कसा फायद्यात आहे हे पटवून देत आहेत , ही बाब मुळात हास्यास्पद आहे. हा विरोधाभास लक्षात न येण्याएवढी जनता दूधखुळी नाही . सत्तांतर होऊन दोन वर्ष झाली तरीही महाडिकांचे टँकर आणि जावयाचा ठेका या पलीकडे विचार न करणाऱ्या लोकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. एकीकडे दूध संघाची स्वतःच्या कुकर्माने वाताहत केलेली असताना , अजूनही वयक्तिक आरोपांमध्ये धन्यता मानणाऱ्या लोकांकडून मुळातच दुसरी अपेक्षा नव्हती .
पत्रकारांसमोर येण्याचे धाडस नसल्यानेच विद्यमान चेअरमन साहेबांना वेठीस धरून 'जबरदस्तीने' त्यांच्या सहीचे पत्रक सतेज पाटलांनी प्रसिद्धीस दिले आहे. मी केलेले आरोप जर खोटे असतील तर आजही माझं खुलं आव्हानं आहे की , सतेज पाटलांनी कधीही एका व्यासपीठावर सामोरासमोर यावं . पत्रकारांसमोर , लाइव्ह मीडिया समोर सर्व आरोप पुराव्यानिशी सिद्ध करण्याची माझी तयारी आहे. त्यांनी स्वतः हे आव्हानं स्वीकारावं .
मुळात कोणाच्या जावयांचा किंवा पै-पाहुण्यांचा ठेका आहे का हा माझ्या पत्रकार परिषदेचा मुद्दाच नव्हता.तरीही सवयी प्रमाणे जाणूनबुजून पै-पाहुण्यांवर घसरायचंच असेल तर संजय डी. पाटलांच्या मेहुण्याला कोणता ठेका दिला गेला ? विद्यमान चेअरमन - संचालक यांच्या पै-पाहुण्यांकडे किती ठेके आहेत ? कोणाचे किती पै-पाहुणे गोकुळ मध्ये नोकरीला लावले गेले ? राधानगरी वाहतूक संघ किंवा शेतकरी संघ या नावांखाली कोणाच्या किती गाड्या गोकुळला लावल्या आहेत ? पॅकिंग किंवा वितरण व्यवस्था बदलताना कोणते नेते किंवा अधिकाऱ्यांनी काय percentage ठरवून दिलेले आहे ? जाहिरातींचा ठेका असेल किंवा नवीन नोकऱ्या असतील या साठी कोणी कोणाच्या माध्यमातून किती पैसे खाल्ले ? या सर्व गोष्टींचा खुलासा देखील मी करू शकते . पण वैयक्तिक टीका न करता संघ कसा टिकेल यावर आजही माझा भर आहे , याचं भान सर्वच सत्ताधारी नेत्यांनी ठेवावं .
मूळ मुद्दा असा होता की गोकुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील म्हैस दूधाचे संकलन 7 लाख 98 हजार 466 लिटरने घटलेलं आहे . गोकुळची मुंबई मधील दूध विक्री 16 लाख 94 हजार लिटरने घटलेली आहे . पुण्यातील परिस्थिती चांगली असूनही सध्याच्या व्यवस्थेत वैयक्तिक द्वेषापोटी खोडा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत . संघाच्या पोट नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संस्था अ वर्ग सभासद कश्या झाल्या ? वाढीव संस्थांच्या तुलनेत जिल्यातील संकलन का वाढलं नाही ?
आणि .... आजच्या खुलाश्यानुसार गृहीत धरायच झालं तर एक दिवसापूर्वी तुम्ही व्यक्त केलेली चिंता आणि वृत्तपत्रांनी छापलेल्या बातम्या खोट्या होत्या का ? याचा जाहीर खुलासा सतेज पाटलांमध्ये हिम्मत असेल तर एका व्यासपीठावर समोर येऊन द्यावा . तारीख , वेळ आणि जागा याची प्रतीक्षा करते .
धन्यवाद !
- सौ. शौमिका अमल महाडिक
सतेज पाटलांमध्ये हिम्मत असेल तर स्वतः समोर येऊन उत्तर द्यावं - शौमिका महाडिक
|