बातम्या

सुळकूड योजनेचे राजकारण केले तर जनआंदोलन करणार -राजू शेट्टी

If the Sulkood scheme is politicized there will be a mass movement Raju Shetty


By nisha patil - 4/14/2024 10:46:48 PM
Share This News:



इचलकरंजी ( प्रतिनिधी )  इचलकरंजी शहराला सुळकूड योजनेमधून शुध्द व मुबलक पाणीपुरवठा करता येणे शक्य असल्याचा सकारात्मक अहवाल मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीपुर्वी मिळाला असतानाही सरकारमधील मंत्र्याच्या दबावाखाली हा अहवाल दाबून शासनाने खेडी व शहर असा वाद निर्माण केली असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी इचलकरंजी येथील पत्रकार परिषदेत बोलताना केली.
         

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की गेल्या अनेक वर्षावासून इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनलेला आहे. स्थानिक नेत्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या श्रेयवादापोटी पाण्याचे राजकारण करून इचलकरंजी शहरातील जनतेला शुध्द व मुबलक पाण्यापासून चालढकल केले जात आहे. पाण्याच्या प्रश्नाबाबत योजना करण्याआधी त्या भागातील शेतक-यांना विश्वासात घेऊन पाणी कमी पडणार नसल्याची खात्री दिल्यास योजना पुर्ण होण्यास कोणतीच अडचण नाही. २०१९ च्या निवडणुकी दरम्यान दानोळी येथील शेतकरी कृती समिती व इचलकरंजी शहरातील लोकप्रतिनिधींच्यामध्ये झालेल्या वादात मी कृती समितीला परिसरातील शेतक-यांना पाणी कमी न पडता इचलकरंजी शहराला शुध्द व मुबलक पाणी कसे देता येते याची समजूत काढण्यासाठी गेलो होतो. मात्र त्याठिकाणी पाण्याचे राजकारण करून मला खलनायक ठरविण्यात आले. २०१८ साली तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अंकली पुलावर कृष्णा नदीवर ४ मीटर बंघारा बांधून पाणीसाठा केल्यास पाणी कमी पडले नसते. सदरचा प्रस्ताव स्वर्गीय एन डी पाटील यांनाही मान्य होता मात्र याकडे जाणीपुर्वक दुर्लक्ष केले गेले. त्यांनतर  शासनाने व महानगरपालिकेने कोणतीच कार्यवाही न करता दुसरीच योजना कार्यन्वित केली. 
         

सध्या सुळकूड योजनेचा वाद पेटला असून याठिकाणीसुध्दा मंत्री , लोकप्रतिनिधी व प्रशासन शेतक-यांची समजूत काढण्यामध्ये अपयशी ठरले आहेत. दुधगंगा धरणामध्ये गळतीमुळे पाणी कमी पडून उन्हाळ्यात कपात होत असल्याचे शेतक-यांचे म्हणणे होते. याबाबत सरकारने परिपुर्ण अभ्यास करून धामणी प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठा व गैबी बोगद्यातून पंचगंगा नदीत पिण्यासाठी व शेतीसाठी सोडण्यात येणार पाणी थांबवून दुधगंगा नदीत सोडण्यात आले असते तर नदी कायमस्वरूपी प्रवाहीत राहून दानवाड पासून ते कागल तालुक्यातील शेतक-यांना पाण्याची कमतरता भासली नसती. सध्या धामणी प्रकल्पातील ३.९५ टीएमसी पाण्याचा शिल्लक साठा असून ते पाणी आरक्षित करून शेतीसाठी दुधगंगा प्रकल्पाच्या आरक्षित शेती व पिण्याच्या आरक्षणासाठी वापरल्यास सुळकूड योजनेत पाणीसाठा मुबलक प्रमाणात शिल्लक राहतो. 
         

 यामुळे मी इचलकरंजी शहरातील नागरीकांना विश्वास देतो की, शासनाने याठिकाणी परत राजकारण केल्यास शेतकरी आंदोलनाप्रमाणे मोठे जनआंदोलन  उभे करून इचलकरंजी शहरातील जनतेला शुध्द व मुबलक पाणी मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. विद्यमान खासदार व आमदार यांना हा प्रश्न समजून न घेता आल्याने  हे दोघेही यामध्ये अपयशी झालेले आहेत. यामुळे शेतकरी , प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून सुळकूड योजनेतून  इचलकरंजी शहराला शुध्द व मुबलक पाणी देणे सहज शक्य आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सागर शंभुशेटे ,इचलकरंजी शहराध्यक्ष विकास चौगुले , बाळासाहेब पाटील , सतिश मगदूम , हेमंत वणकुंद्रे , ॲड. प्रवीण उपाध्ये यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी उपस्थित होते.


सुळकूड योजनेचे राजकारण केले तर जनआंदोलन करणार -राजू शेट्टी