बातम्या
सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर अंतर्गत अवैध शिकार व वन्यप्राणी अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी सायबर सेल स्थापन
By nisha patil - 10/5/2024 4:53:06 PM
Share This News:
वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर अंतर्गत अवैध शिकारी व वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव, कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर वन्यजीव वनवृत्तांमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती प्रमाणे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूरमध्ये सायबर सेल स्थापन करण्यात आला असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस.एस.पवार यांनी दिली.
वन्यजीव व वनगुन्हे यांना आळा घालण्यासाठी संशयित आरोपी यांच्यावरील आरोप सिद्द होण्यासाठी सी.डी.आर. , एस.डी.आर , एल.टी.एल. , टी.डी.डी , या कार्यालयाकडे अधिकृतपणे मागविण्यात आलेली माहिती गोपनीय पध्दतीने संबंधित मागणी करण्या-या विभागाला पुरविण्यात येणार असून त्याचा फायदा अवैध शिकारी व वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी तसेच तपास करण्यासाठी वन विभागाकडील क्षेत्रिय कर्मचारी-अधिकारी यांना होणार आहे.
सायबर सेल विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) कोल्हापूर यांचे कार्यालय विचारेमाळ, सदर बाजार, कोल्हापूर येथील कार्यालयामध्ये सुरु होत असून सायबर सेलचे उद्घाटन कोल्हापूर सह्याद्री व्याघ्र राखीवचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर. एम. रामानुजम यांच्या हस्ते दि. 7 मे रोजी झाले आहे.
सायबर सेल स्थापनेसाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (बनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम, मुंबई यांचे आवश्यक मार्गदर्शन लाभले असून या सायबर सेलव्दारे क्षेत्रिय कर्मचारी यांना वने व वन्यजीव विषयक गुन्हे हाताळणे व आरोपीच्या विरोधात पुरावे गोळा करणे व राज्या बाहेरील आरोपींनाही पकडणे सोईचे होणार आहे. सायबर सेलच्या माध्यमातून वने व वन्यजीव गुन्ह्यामधील आरोपींना शिक्षा होण्यास मदत मिळणार असून क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना त्याचा अधिकचा फायदा होऊन त्यांचे मनोबल वाढणार आहे.
वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर.एम. रामानुजम यांनी सायबर सेल सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूरसाठी काम करणा-या कर्मचारी व अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व अधिक तत्परतेणे व परिणामकरित्या कार्य करुन वने व वन्यजीव विषयक अपराधांवर आळा घालण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास उपवनसंरक्षक (प्रादेशिक) जी. गुरुप्रसाद, विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस.एस. पवार, सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी एस.डी. गवते तसेच वनविभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर अंतर्गत अवैध शिकार व वन्यप्राणी अवयवांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्यासाठी सायबर सेल स्थापन
|