बातम्या

कॅल्शियमचे महत्त्व

Importance of calcium


By nisha patil - 7/31/2023 7:32:15 AM
Share This News:



 माणूस वृद्धत्वाकडे झुकायला लागला की, त्याची हाडे नाजूक व्हायला लागतात आणि छोट्या-मोठ्या अपघाताने फ्रॅक्चर होणे असे प्रकार घडायला लागतात. शरीरामध्ये कॅल्शियम कमी असले की हाडे लवकर कमकुवत होतात आणि असे प्रश्न निर्माण होतात.
म्हणून कॅल्शियमचा पुरवठा शरीराला भरपूर झाला पाहिजे, असे डॉक्टर सांगतात. वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत शरीराला कॅल्शियम मिळत आहे की नाही, याचा कधी विचार केलेला नसतो आणि 50 व्या वर्षानंतर त्याचे परिणाम जाणवायला लागतात. मग लोक जागे होतात आणि टॉनिक, पोषक आहारद्रव्ये यांच्यासोबतच कॅल्शियमही दिले जाते. आता ही गोष्ट सर्वांना माहीतच झालेली आहे.
ऑस्टिओपोरोसिस हा विकार वृद्धत्वात टाळण्यासाठी शरीराला कॅल्शियम मिळणे आवश्यक आहे, हे लोकांच्या मनावर बिंबले आहे. मात्र आता याबाबतीत सुद्धा तज्ज्ञांमध्ये वेगळा अनुभव यायला लागला आणि त्यांनी याबाबतीत थोडा सावधानतेचा इशारा दिला आहे.

भरपूर कॅल्शियम म्हणजे मजबूत हाडे, असे काही समीकरण तयार करता येणार नाही. तेव्हा हाडे मजबूत करण्यासाठी कोणी अतिरेकी कॅल्शियम घेत असेल तर त्यांनी त्यापासून सावध राहिले पाहिजे. काही वेळा मर्यादेपेक्षा अधिक कॅल्शियमचा पुरवठा शरीराला झाला तर उलट हाडांचे नुकसान होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. या संबंधीचे शास्‍त्र थोडे समजून घेतले पाहिजे. ऑस्टिओपोरोसिस हा कॅल्शियमच्या कमतरतेचा विकार नाही. तेव्हा केवळ कॅल्शियम घेतल्याने हाडे मजबूत होतील आणि वृद्धावस्थेमध्ये ऑस्टिओपोरोसिसपासून सुटका होईल असे काही मानता कामा नये. ऑस्टिओपोरोसिस हा फार गुंतागुंतीचा विकार आहे. त्यामागे व्यायामाचा अभाव, दीर्घकाळचा शरीराचा दाह, जीवनसत्त्वाचा अभाव, सूक्ष्म द्रव्यांचा अभाव आणि पोषण विषयक असमतोल हीही ऑस्टिओपोरोसिसची कारणे आहेत. तेव्हा हे लक्षात घेतले म्हणजे कॅल्शियमच्या गोळ्या खाल्ल्याने ऑस्टिओपोरोसिस टळेल, हा गैरसमज असल्याचे समजेल. हे टाळायचे असेल तर ड जीवनसत्त्वाचा पुरवठा करणारा आहार घेतला पाहिजे. शरीराला थोडे उन्हातून फिरवले पाहिजे. उन्हातून मुबलक प्रमाणात ड जीवनसत्त्व मिळते.


कॅल्शियमचे महत्त्व