बातम्या

पालकमंत्री दीपक केसरकरांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

Important decisions in the review meeting in the presence of Guardian Minister Deepak Kesarkar


By nisha patil - 7/27/2023 6:21:00 PM
Share This News:



 कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. कोल्हापूरमधील शाळा उद्यापासून पूर्ववत होणार आहेत. त्याचबरोबर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबाना उद्या (28 जुलै) घरी परत पाठवलं जाणार आहे. तसेच बालिंगा पुलावरून एकेरी वाहतूक सुरु करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. 

दीपक केसरकर म्हणाले की, जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे, पण पंचगंगा नदीची पाणी पातळी एक इंचाने वाढली आहे. नागरिकांनी गोंधळून जाऊ नये. सतर्कता म्हणून आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात. उद्यापासून जिल्ह्यातील सर्व शाळा पूर्ववत सुरू होतील. स्थलांतरित झालेल्या नागरिकांना उद्या सकाळपासून घरी जाण्यास सांगितले आहे. मुलांच्या परीक्षा आहेत त्यांच्यासाठी वेगळी तारीख देण्यात येईल. मुलांच्या परीक्षेवर, अभ्यासावर कोणताही परिणाम होणार नाही. 

ज्या जिल्ह्यांमधील आज शाळांमधील परीक्षा रद्द करण्यात आली आहे, त्यांना नवीन तारखा देण्यात येतील. धोकादायक इमारतींवर तातडीने कारवाई सुरु करण्यात येईल, जिल्ह्यात पावसाच्या दुर्घटनेत दोन बळी गेले असून त्यांना शासकीय मदत करणार असल्याचेही केसरकर म्हणाले. 

बालिंगा पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याच्या सूचना
केसरकर यांनी बालिंगा पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती दिली. भोगावती नदीत पाण्याचा प्रवाह वेगाने असल्याने जुना असलेल्या बालिंगा पुलावरून प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतूक बंद केल्यापासून करवीर तालुक्याच्या पश्चिमेसह गगनबावडा तसेच पुढे कोकणात जाणाऱ्या वाहतुकीला प्रचंड फटका बसला आहे. पादचाऱ्यांनाही वाहतूक बंद करण्यात आल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर हलक्या व दुचाकी वाहनांना बालिंगा पुलावरून वाहतूक सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याने साबळेवाडी फाटा व बालिंगाजवळ लावण्यात आलेली बॅरिकेट्स हटवून वाहतूक सुरू झाली आहे.


पालकमंत्री दीपक केसरकरांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय