बातम्या
डी वाय पाटील फार्मसी मध्ये ‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन
By nisha patil - 5/15/2024 6:02:07 PM
Share This News:
डी वाय पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांसाठी ‘जी पॅट’ एक्झामबाबत मार्गदर्शनपर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. प्राचार्य डॉ. सी एम जंगमे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेत ‘जी पॅट’ प्रशिक्षक आणि करिअर मार्गदर्शक, फार्मस्टार अकेडमी नांदेडचे संचालक डॉ विजयकुमार चकोते यांनी यावेळी परीक्षेतील यशाचे मंत्र विद्यार्थ्यांना दिले.
तृतीय व चतुर्थ वर्ष बी फार्मसी चे विद्यार्थी ‘जी पॅट’ परीक्षेसाठी पात्र आहेत. मात्र विद्यार्थ्याना या परीक्षेचे महत्त्व, त्याची तयारी याबाबत द्वितीय वर्षामध्येच मार्गदर्शन मिळावे व त्यातून अधिकाधिक विद्यार्थी या मध्यमातून यशस्वी व्हावेत यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. चकोते यांनी परीक्षा पद्धती व त्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या परीक्षेला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जिद्द चिकाटी व परिश्रम या चतुसूत्रीचा मूलमंत्र डॉ. चकोते यांनी दिला. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्याना 2 वर्षांसाठी पदव्युत्तर शिक्षण घेताना दरमहा 12,400 विद्यावेतन दिले जाते. ड्रग इन्स्पेक्टर, पीएचडी तसेच राष्ट्रीय औषध शिक्षण संशोधन संस्थेमध्ये प्रवेश अशा अनेक परीक्षांचे दालन खुले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच या परीक्षेची तयारी करावी असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन प्रा. वैष्णवी मंगरुळे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. अभिनंदन पाटील यांनी तर सूत्रसंचालन व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. केतकी धने यांनी करून दिली. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही.व्ही. भोसले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
डी वाय पाटील फार्मसी मध्ये ‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन
|