बातम्या

पालघरमध्ये सरकारी वकील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

In Palghar public prosecutor in the net of bribery department


By nisha patil - 10/26/2023 7:49:57 PM
Share This News:



एका पोलीस कर्मचाऱ्याकडून लाच घेणाऱ्या सरकारी वकिलाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. पालघर जिल्ह्यातील  अतिरिक्त सत्र न्यायालयातील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता वर्ग  1   सुनील बाबुराव सावंत यांना 7000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाकडून हुतात्मा स्तंभाजवळ रंगेहाथ पकडण्यात आले. सावंत हे गेल्या सात वर्षांपासून पालघर येथील नायालयात सरकारी वकील म्हणून कामकाज पाहत होते.

पालघर जिल्हा पोलीस दलातील पोलीस नाईक यांच्यावर सन 2015 मध्ये तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 3/ 15 कलम 376 भादंविप्रमाणे दाखल होता. जून 2023 मध्ये न्यायालयाने त्यांना निर्दोषमुक्त करण्यात आले होते. पालघर जिल्हा पोलीस दलाकडून तक्रारदार पोलीस कर्मचाऱ्याने पदोन्नतीसाठी अर्ज केला होता. त्याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अतिरिक्त सरकारी वकील पालघर त्यांच्याकडे पत्रव्यवहार करून निर्दोष सुटल्याबाबत अहवाल मागण्यात आला होता. तो अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास देण्यासंबंधी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोड करण्यात आली आणि 7000 रुपये लाचेची रक्कम ठरवण्यात आली. ती रक्कम स्वीकारताना  लाच लुचपत प्रतिबंधक  विभागाकडून हुतात्मा स्तंभा जवळ रंगेहाथ पकडण्यात आले.

या सापळा पथकात  दयानंद गावडे, पोलीस उपअधीक्षक, शिरीष चौधरी, पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार अमित चव्हाण,  पोलीस हवालदार संजय सुतार,  पोलीस हवालदार नवनाथ भगत,  पोलीस हवालदार नितीन पागधरे,  पोलीस हवालदार योगेश धारणे, महिला पोलीस हवालदार निशिगंधा मांजरेकर, महिला पोलीस नाईक स्वाती तारवी आणि पोलीस शिपाई जितेंद्र गवळी यांचा समावेश होता.


पालघरमध्ये सरकारी वकील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात