बातम्या

उन्हाळ्यात ‘या’ योगासनांंमुळे मिळेल शरीराला शितलता

In summer these yoga poses will cool the body


By nisha patil - 3/15/2024 7:24:52 AM
Share This News:



अशी काही योगासने आहेत, जी केल्याने शरीराला शितलता प्राप्त होते. शरीराला गारवा मिळतो. अशी योगासने उन्हाळ्यात केल्यास उष्णतेपासून आराम मिळतो. जर नियमितपणे काही वेळ ही योगासने केल्यास उष्णता कमी होऊ शकते. तसेच मेंदूदेखील शांत राहतो.

‘शीतली प्राणायाम’ केल्यास शरीराला शितलता मिळते.हे प्राणायाम करताना प्रथम संपूर्ण शरीराला सैल आणि शांत ठेवा आणि डोके, घसा आणि पाठीच्या कण्याला योग्य स्थितीमध्ये ठेवून आरामात बसा. या प्राणायामात तोंड उघडून जिभेला नालीसारखे करा आणि नालीद्वारे हळूहळू श्वास आत ओढा. नंतर तोंड बंद करून काही वेळापर्यंत श्वास आत रोखून ठेवा. नंतर नाकाने श्वास सोडा. असे आठ ते दहा वेळा करा. हे आसन नियमित केल्यास भूक आणि तहानेचे प्रमाण नियंत्रणात राहते आणि मन शांत ठेवते. शरीरात शीतलता टिकून राहते. पित्ताची समस्या दूर होते आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

तसेच बद्ध कोनासन केल्यानेही शरीर शितल राहते. हे आसन करताना दंडासनात बसावे. नंतर गुडघे दुमडून पसरवावे आणि पायांच्या पंज्यांना चिकटवा. मांड्यांना पसरवा आणि गुडघ्यांना जमिनीवर दाबा. आता पाठीचा कणा सरळ ठेवून सामान्य श्वास घेऊन एक ते पाच मिनिटांपर्यंत थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करा. या आसनामुळे बाहेर रखरखीत उन्हाळा असूनही शरीराला गारवा मिळतो. थकवा आणि तणाव दूर करण्यास फायदेशीर आहे. सायटिका, हर्नियामध्ये ते लाभदायी आहे.शवासन केल्यानेही शरीराला गारवा मिळतो. हे आसन करण्यासाठी जमिनीवर पाठीवर एकदम सरळ झोपा. दोन्ही हातांना आपल्या शरीराला एक ते दीड फुटाच्या अंतरावर ठेवा. पंज्यांना वरच्या बाजूला ठेवा आणि बोटांना थोडे वाकवा. दोन्ही पायांना सरळ ठेवून दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा आणि शांत पडून राहा. दोन्ही डोळे बंद ठेवा आणि डोके आणि पाठीच्या कण्याला एकदम सरळ ठेवा. डोक्यात कोणतेही विचार न आणता डोळे बंद करा. या मुद्रेचा ३ ते ५ मिनिटांपर्यंत सराव करा आणि आरामाचा अनुभव घ्या. शवासन केल्याने उष्णतेतही गारव्याचा अनुभव मिळतो. नसांना आराम मिळतो आणि ऑक्सिजन सूंपर्ण रक्तामध्ये पसरतो. ज्यामुळे शरीरात गारवा टिकून राहतो. तणाव दूर करण्यासही मदत होते.

शीतकारी प्राणायाम केल्यानेही शरीराला गारवा मिळतो. हे प्राणायाम करताना प्रथम संपूर्ण शरीराला सैल ठेवा. नंतर डोके, घसा आणि पाठीच्या कण्याला एका स्थितीत ठेवा आणि आरामात बसा. शीतकारीमध्ये दातांवर दात ठेवून श्वास घ्या. काही वेळ श्वास आत रोखून ठेवल्यानंतर ओठ बंद करून नाकाने श्वास सोडून द्या. ८ ते १० वेळा करावे. अस्थमाचे रुग्ण, सर्दी-पडसे असल्यास, रक्तदाब कमी असल्यास हे आसन करू नये. शीतली आणि शीतकारी प्राणायाम जेवणाच्या दोन तासांनंतर करावे.


उन्हाळ्यात ‘या’ योगासनांंमुळे मिळेल शरीराला शितलता