बातम्या
राज्यसभेत धनंजय महाडिकांकडून केंद्रीय विद्यालय, आरोग्य केंद्राची मागणी तर आमदार सतेज पाटलांकडून कोल्हापुरात एअरविंगची मागणी
By nisha patil - 4/8/2023 4:59:55 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थ्यांना नवीन संधी देऊ शकेल, असे एअरविंग हे ‘एनसीसी’च्या कोल्हापूर मुख्यालयात सुरू करावे, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली. सतेज पाटील यांनी केलेल्या या मागणीवर सरकार सकारात्मक असल्याची माहिती संजय बनसोडे यांनी दिली. कोल्हापूर विमान प्राधिकरणाशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे बनसोडे यांनी सांगितले.
कोल्हापुरात 1960 मध्ये एनसीसीचे ग्रुप मुख्यालय सुरू झालं आहे. येथे 21 हजार कॅडेट कार्यरत आहेत. आर्मीच्या 8 व नेव्हीचे 1 युनिट कार्यरत आहे. एनसीसी ग्रुप मुख्यालयाच्या माध्यमातून आर्मी व नेव्हीचा अभ्यासक्रम शिकविला जातो. कोल्हापुरात विमानतळ उपलब्ध असल्याने एअरविंग एनसीसी सुरू करण्याची मागणी होत आहे. तत्कालीन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला होता. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित असून, याबाबत सरकार काय कार्यवाही करणार, असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला.सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापुरात एअरपोर्ट उपलब्ध आहे. एअरविंगच्या एनसीसीच्या माध्यमातून प्रचंड संधी उपलब्ध आहेत. 10 टक्के संधी अकॅडमीमध्ये आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थीनींची विंग कोल्हापुरात सुरु व्हावे, अशी मागणी आहे.
दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात केंद्रीय आरोग्य केंद्र सुरू करावे अशी मागणी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. त्याचा उपयोग कोल्हापूर शहर आणि 11 तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे 1 लाखपेक्षा अधिक कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांना होऊ शकेल. शिवाय सैन्यातील जवान, माजी सैनिक यांच्या आरोग्यासाठी केंद्रीय आरोग्य केंद्र महत्वाचे आहे. पुणे येथे केंद्र सरकारचे आरोग्य केंद्र आहे. मात्र कोल्हापुरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना, पुण्यात जाऊन आरोग्य विषयक सुविधा घेणे शक्य होत नाही. त्यामुळे लवकरात लवकर कोल्हापुरात केंद्रीय आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी राज्यसभेत केली. त्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दरम्यान महाडिक यांनी कोल्हापुरात केंद्रीय विद्यालय सुरू करावे, अशी मागणी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे. कोल्हापुरात सुमारे 1 लाखांपेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी काम करतात. कोल्हापुरात सैन्याची एक प्रादेशिक बटालियनसुध्दा आहे. केंद्रीय विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला आहे. म्हणूनच बेळगाव आणि पुणे या ठिकाणाप्रमाणेच कोल्हापुरातही केंद्रीय विद्यालय सुरु करावे, अशी मागणी राज्यसभेत महाडिक यांनी केली आहे. केंद्रीय विद्यालय सुरु करण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली असून, कोल्हापुरात केंद्रीय विद्यालय सुरु करण्याबद्दल योग्य प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांनी महाडिक यांच्या मागणीला उत्तर देताना सांगितले.
राज्यसभेत धनंजय महाडिकांकडून केंद्रीय विद्यालय, आरोग्य केंद्राची मागणी तर आमदार सतेज पाटलांकडून कोल्हापुरात एअरविंगची मागणी
|