बातम्या
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठेच्या मध्यभागी पार्किंगची व्यवस्था करावी - करवीर तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
By nisha patil - 10/19/2024 10:07:36 PM
Share This News:
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेत पोलीस प्रशासनाने जो बदल केला आहे तो मूळ बाजारपेठेतील बहुसंख्य व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी बाजारपेठेच्या मध्यभागीच पार्किंग करून ग्राहकांना मूळ बाजारपेठेत येण्यास मज्जाव करणे गैर व तमाम व्यापारी वर्गाला अन्यायकारक आहे. कोणावरही अन्याय होऊ नये याची दक्षता घेऊन फेर वाहतूक व्यवस्था करावी.
पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठ म्हणून गांधीनगरची ओळख आहे. या बाजारपेठेत कर्नाटक, गोवा, कोकण व राज्यातील अन्य जिल्ह्यातून व्यापारी व ग्राहक खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे येजा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वाहनांची संख्याही मोठी असते. त्यातच दिवाळी तोंडावर आल्याने मोठी गर्दी होणार आहे. वाहतुकीला शिस्त लावण्याचा आपला प्रयत्न राहिला आहे. त्यानुसार पोलीस प्रशासनाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे. पार्किंग व्यवस्था जी केली आहे ती मूळ बाजारपेठेला घातक ठरणाररी आहे. सिंधू मार्केट, गुरुनानक मार्केट, स्वस्तिक मार्केट, झुलेलाल मार्केट, गजानन मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट या सर्व मार्केटमधील व्यापाऱ्यांना हा वाहतूक व्यवस्थेतील बदल मारक ठरणार आहे. कारण पार्किंग व्यवस्था बाजारपेठेच्या दोन्ही बाजूस करणे उचित होते. मात्र पार्किंग व्यवस्था एका बाजूलाच करून मूळ मार्केटला म्हणजे वरील सर्व मार्केट मधील सर्व व्यापाऱ्यांवर अन्याय झाला आहे. पार्किंग व्यवस्था एका बाजूलाच केल्याने मूळ बाजारपेठेत ग्राहक येऊ शकणार नाही, अशी व्यवस्थाच पोलीस यंत्रणे कडून करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जे पार्किंग पोलीस यंत्रणेने सुचवले आहे तिथून ते तावडे हॉटेल पर्यंतच्या व्यापाऱ्यांचे केवळ हीत जपण्याचा प्रयत्न झाला आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना समान न्याय व हक्क असतो. मग एका बाजूलाच पार्किंग व्यवस्था करून मूळ बाजारपेठेवर अन्याय करण्याचा प्रयत्न अत्यंत चुकीचा व लोकशाहीला घातक आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून आपण केलेला प्रयत्न जरूर चांगला आहे. पण त्यात सर्व व्यापाऱ्यांचे हित जपण्याचे कर्तव्य झालेले नाही. ही कसूर दूर करून नव्याने वाहतूक व्यवस्था करावी. जेणेकरून कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय होता कामा नये. तावडे हॉटेल पासून चिंचवाड रेल्वे फटका पर्यंत सर्व व्यापाऱ्यांपर्यंत ग्राहक राजा पोहोचला पाहिजे, याचे भान पोलीस प्रशासनाने ठेवले पाहिजे. वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून तावडे हॉटेल कडून येण्याचा मार्ग असावा व जाण्याचा मार्ग चिंचवाड-गडमुडशिंगी-उचगाव-कोल्हापूर असा असावा. याशिवाय तावडे हॉटेलकडील बाजूस पार्किंग व्यवस्था असावी व चिंचवाड रेल्वे फाटक परिसरात पार्किंग व्यवस्था असावी. असे झाल्यास कोणा व्यापाऱ्यावर अन्याय होणार नाही. मग तो तावडे हॉटेल कडील बाजूचा असो अथवा सिंधू मार्केट कडील जुन्या बाजारपेठेतील व्यापारी असो त्याच्यावर अन्याय होणार नाही. सबब आपण केलेल्या पार्किंग व्यवस्थेचा फेरविचार करावा. सर्वांना समान न्याय मिळावा. कोणावरही अन्याय होता कामा नये. आपण केलेल्या पार्किंग व्यवस्थित ताबडतोब बदल करावा.
यावेळी बोलताना करवीर तालुका प्रमुख राजू यादव म्हणाले की, वीट भट्टी जवळ असणाऱ्या चार-पाच मोठ्या दुकानदारांनाच याचा फायदा का व मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या ४०० ते ५०० दुकानदारांवर अन्याय का तसेच वीट भट्टी जवळ वाहतूक पोलिसांची गाडी आली की तेथे सायरन वाजायचा बंद होतो तिथे काय लहुचुंबक लागतो का तेथील रस्त्यावर लावलेल्या गाड्यांकडे दुर्लक्ष केले जाते असा आरोप राजू यादव यांनी केला. सध्या गांधीनगर येथे रेल्वे थांबा बंद आहे त्यामुळे आधीपासूनच मुख्य बाजारपेठेत व्यवसायही कमी होऊन बाजारपेठेवर संकट ओढावले आहे त्यामुळे दिवाळी खरेदीसाठी येणाऱ्या गाड्या आतपर्यंत सोडून छोट्या दुकानदारांनाही व्यवसाय करण्याची संधी द्यावी.
या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने मा. उपविभागीय पोलिस अधिकारी करवीर यांच्या नावे गांधीनगरचे सहाय्यक पोलीस अधिक्षक मा.दिपक जाधव यांना देण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी कोणत्याही व्यापाऱ्यांच्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, दिलिप सावंत, दिपक फ्रेमवला, शरद माळी, बाळासाहेब नलवडे, दिपक अंकल, सुनिल पारपाणी, किशोर कामरा, दीपक धिंग, रिटेल व्यापारी अध्यक्ष दीपक कुकरेजा, सतीश कारडा, रमेश वाच्छांनी, सुनील जयसिंगानी, संतोष निरंकारी, दिलीप केसवानी, श्याम चावला, जयशंकर ठकरानी, शंकर बटेजा, सोहन सावलानी, सनी सुखवानी, अंश चावला, बंटी बचानी, गुलाब सुंदरानी, अमर साधवानी, मनीष दर्यानी, अमित कमवाणी, सुनील डोवाणी, श्याम आहुजा, महेश दुसेजा, अजय चंदवानी, नंद रंगलानी, सुनील जयसिंगानी आदी शिवसैनिक व व्यापारी उपस्थित होते.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गांधीनगर बाजारपेठेच्या मध्यभागी पार्किंगची व्यवस्था करावी - करवीर तालुका शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)
|