विशेष बातम्या
सिध्दनेर्ली येथे लाल बावटा कामगार भवनाचे उद्घाटन
By nisha patil - 10/2/2025 10:32:34 PM
Share This News:
सिध्दनेर्ली येथे लाल बावटा कामगार भवनाचे उद्घाटन
सिध्दनेर्ली (ता. कागल) - "कामगार आणि चळवळीतील नेत्यांनी एकजुटीने संघटना मजबूत केली नाही, तर गोरगरिबांना श्वास घेणेही मुश्किल होईल," असे मत सिटूचे राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी व्यक्त केले. कागलच्या कामगारांनी एकसंध होऊन आपल्या हक्काचे कार्यालय उभारून राज्याला आदर्श घालून दिला आहे. हे कामगार भवन श्रमिकांचे विद्यापीठ व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
लाल बावटा बांधकाम कामगारांनी लोकवर्गणी आणि श्रमदानातून सुसज्ज कामगार भवनाची उभारणी केली असून, या इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी जिल्हा सचिव काँ. शिवाजी मगदूम यांनी कामगारांच्या मेहनतीचा आढावा घेतला. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष भरमा, सुभाष जाधव, शिवगोंडा खोत, चंद्रकांत यादव, दत्ता माने, विनायक सुतार, उज्वला पाटील, मोहन गिरी, विलास पवार, प्रकाश कुंभार, भगवान घोरपडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत विक्रम खतकर यांनी केले, तर सूत्रसंचालन विजय कुरणे यांनी केले.
लाल निशाणाची पदयात्रा आणि सांस्कृतिक रंगत
तालुक्यासह जिल्ह्यातून हातात लाल निशाण आणि संघटनेची लाल पताका घेऊन आलेल्या कामगारांनी उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला पदयात्रा काढली. महिलांनी आंबिल कलश आणि गारवा डोक्यावर घेऊन सहभाग घेतला, तर हालगी आणि ताशांच्या निनादाने सोहळ्यात जोश भरला.
तालुक्यातील पक्षाचे पहिले कार्यालय
कागल तालुक्यात अनेक पक्षांचे कार्यकर्ते कार्यरत असले तरी एका पक्षाचेही अधिकृत कार्यालय नव्हते. त्यामुळे पक्ष बदलाचा विषयच नसल्याने लाल बावट्याचे कार्यालय होत असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.
सिध्दनेर्ली येथे लाल बावटा कामगार भवनाचे उद्घाटन
|