बातम्या

शहाजी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन

Inauguration of Marathi language conservation fortnight in Shahaji college


By nisha patil - 1/16/2024 8:03:27 PM
Share This News:



कवितेच्या शब्दातून क्रांती घडते:कवी रमजान मुल्ला
 शहाजी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन

 कोल्हापूर: कवितेच्या शब्दातून क्रांती घडते असे प्रतिपादन कवी रमजान मुल्ला यांनी केले.श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन झाले.त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी नवोदित कवींचे कवी संमेलन झाले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. 
प्रारंभी वृक्षास जल अर्पण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. श्री मुल्ला कवितेबाबत म्हणाले, कवितेतील शब्दांना काळजातून जोडले पाहिजे. कवितेत शब्दांना काळीज जोडावे लागते तेव्हा चांगली आणि वेदनेची कविता निर्माण होते.  कुटुंबातील नातेसंबंधाच्या अनुषंगाने त्यांनी विविध कविता यावेळी सादर केल्या, श्रोत्यांनी त्यास दाद देऊन मनमुराद आनंद घेतला. या काव्य संमेलनातून त्यांनी मराठी भाषेची परंपरा, थोरवी आणि समृद्धी विशद केली. 

 

प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण म्हणाले, जी कविता वेदना सांगते ती चांगली कविता तसेच वेदना मांडलेली कविता मनाला भावते आणि त्यातून वेगळ्या अनुभवाची अनुभूती येते. स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. दीपककुमार वळवी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पी.के.पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. पल्लवी कोडग यांनी करून दिली. आभार डॉ.सयाजीराव गायकवाड यांनी मांनले 
 

 या कवी संमेलनात राहुल संजय शिंगे, डॉ.विजय देठे, प्रा. अमरसिंह शेळके, डॉ.शोभा चाळके म्हमाने यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या.  कार्यक्रमास डॉ.आर.डी.मांडणीकर, दमसाचे कोल्हापूर प्रतिनिधी अजित पाटील,  प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.श्री मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने महाविद्यालयात पुस्तक निर्मिती प्रकाशन प्रक्रिया आणि ई बुक निर्मिती प्रक्रिया व्याख्यान, कविता वाचन व गायन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.विजय जाधव यांचा भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम तसेच सुलेखन प्रशिक्षण कार्यशाळा, प्रमाण मराठी भाषा लेखन आणि मुद्रित शोधण कार्यशाळा, ग्रंथ प्रदर्शन, नामांकित ग्रंथाचे अभिवाचन अशा विविध प्रकारच्या कार्यकमाचे आयोजन मराठी विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे.


शहाजी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन