बातम्या
शहाजी महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिराचे बहिरेश्वर येथे उद्घाटन
By nisha patil - 1/17/2024 3:03:23 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिराचे बहिरेश्वर येथे उद्घाटन
राष्ट्रीय सेवा योजनेचे काम ग्रामविकासासाठी दिशादर्शक :आमदार पी एन पाटील
कोल्हापूर: राष्ट्रीय सेवा योजनेचे काम ग्रामविकासाठी,खेड्यांच्या विकासासाठी दिशादर्शक असे आहे. महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला या संकल्पनेशी हे सुसंगत आहे. प्रत्येकाने किमान दोन झाडे लावून ती जगवावीत असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार पी एन पाटील यांनी केले. बहिरेश्वर तालुका करवीर येथे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर बहिरेश्वर तालुका करवीर येथे सुरू आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आमदार श्री पी. एन. पाटील बोलत होते. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे (दादा), बहिरेश्वरच्या लोकनियुक्त सरपंच सौ. वंदना निवृत्ती दिंडे- पाटील, गोकुळचे संचालक श्री बाळासाहेब खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी वृक्ष जल अर्पण करून या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आमदार श्री पी. एन. पाटील म्हणाले, खेडीही शहरासारखे स्वयंपूर्ण होत आहे. मात्र येथील नोकरदार वर्ग शहरात स्थायिक होताना दिसत आहे.या खेड्यांच्या ग्रामविकाससाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे काम दिशादर्शक असे आहे. गाव सुधारण्याचा हा एक चांगला उपक्रम आहे. वाढत्या प्रदूषणामुळे मानवी जीवन संकटात आल्याने प्रत्येकाने किमान दोन झाडे लावून ती जगवावीत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण म्हणाले, देश बलवान होण्यासाठी खेड्यांचा विकास अपेक्षित आहे. खेड्याकडे चला ही गांधीजींनी संकल्पना मांडली होती.खेड्यातील तरुणांच्या शक्तीला विधायक दिशा देण्यासाठी श्रमदान, बौद्धिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे शिबिराच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले आहे. गाव उभा करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी एन एस एस शिबिर उपयुक्त ठरणार आहे, यासाठीचे हे पहिले पाऊल आहे.
स्वागत व प्रास्ताविक एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. एल. काशीद-पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. राजकिरण बिरजे यांनी केले. आभार डॉ.शिवाजी जाधव यांनी मांनले.या उद्घाटन कार्यक्रमास उपसरपंच शुभांगी सचिन दिंडे पाटील, ग्रामपंचायत सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी,शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे अधीक्षक रुपेश खांडेकर,महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी , स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते .
शहाजी महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिराचे बहिरेश्वर येथे उद्घाटन
|