बातम्या

शिवाजी विद्यापीठात राज्यस्तरीय अक्षर संमेलनाचे उद्घाटन

Inauguration of State Level Akshar Samelan in Shivaji University


By nisha patil - 5/25/2024 3:40:02 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. २४ मे: मानवाचे जीवन सुंदर होण्यासाठी उपजीविकेला जीविकेची जोड असणे महत्त्वाचे असते. यादोन बाबींचे संतुलन आयुष्य समृद्ध करते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनीआज येथे केले. माझी शाळा, माझा फळा समूह आणि शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
 

कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, मानवाला जगण्यासाठी उपजीविकेची आवश्यकता असते. मात्र त्याचे आयुष्य सुंदर
होण्यासाठी त्याला जीविकेची जोड आवश्यक ठरते. जगावे कसे, यासाठी उपजीविका असते, तर जगायचे का, हे
जीविका निश्चित करते. माणसाचे जीवन समृद्ध होण्यासाठी या दोन्ही बाबींचा समावेश आणि संतुलन असावे लागते.खरा कलाकार हा त्यातूनच निर्माण होतो. या दोन बाबीच त्याला आपल्या कलेच्या माध्यमातून सामाजिक दायित्व निभावण्यासाठी प्रवृत्त करीत असतात. म्हणूनच कलाकार कलेद्वारे आपले सामाजिक-सांस्कृतिक योगदान देण्यासाठी प्रेरित झालेला असतो. अक्षर संमेलनाच्या माध्यमातून अशा सर्जनशील कलाकारांचे विद्यापीठामध्ये एकत्र येणे हा अत्यंत चांगला संकेत आहे. या संमेलनातून अनेक सकारात्मक व सृजनशील बाबी सामोऱ्या येतील आणि नवोदित कलाकारांना प्रेरित करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

यावेळी सुरवातीला डॉ. शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर माजी स्वागताध्यक्ष प्रशांत वाघमारे व ज्येष्ठ चित्रकार संजय शेलार यांनी मनोगत व्यक्त केले. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी स्वागत केले. अक्षर संमेलनाचे संयोजक अमित भोरकडे यांनी प्रास्ताविक केले, तर स्वागताध्यक्ष सतीश उपळावीकर यांनी आभार मानले. यावेळी शुभम गायकवाड, नरेंद्र महाडिक, ज्ञानेश पाटमाशे, विजागत ज्ञानेश्वर, राजेंद्र हंकारे यांच्यासह राज्यभरातील कलाकार उपस्थित होते.


शिवाजी विद्यापीठात राज्यस्तरीय अक्षर संमेलनाचे उद्घाटन