बातम्या

नवीन एचआयव्ही संसर्गितांना वेळेत उपचार मिळण्यासाठी तपासण्या वाढवा -जिल्हाधिकारी अमोल येडगे

Increase testing to ensure timely treatment of new HIV infections


By nisha patil - 3/14/2024 9:37:35 PM
Share This News:



कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): एचआयव्ही संसर्गित रुग्णांचा शोध घेवून त्यांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात एचआयव्ही तपासण्या वाढवा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केल्या. 

     जिल्हा एड्स नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजेश गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुप्रिया देशमुख, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, एचआयव्ही संसर्गितांचे आयुर्मान सुधारण्यासाठी त्यांना वेळेत उपचार मिळवून देणे आवश्यक आहे. यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवा. जिल्ह्यातील काही तालुक्यातील नागरिक मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये नोकरी किंवा उद्योग, व्यवसाय करत आहेत. असे नागरिक सुट्टीसाठी अथवा सण समारंभांच्या दरम्यान गावामध्ये येत असतात. त्यामुळे अशा सणांच्या दरम्यान गृहभेटी देऊन एचआयव्ही सह इतर आवश्यक तपासण्या करुन घ्या. एचआयव्ही संसर्गित गरजू रुग्णांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून द्या, असे त्यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात तपासण्या वाढविण्याची आवश्यकता असून उपकेंद्रात एचआयव्ही तपासणी किट साठवणूकीसाठी रिफ्रजरेटर ची मागणी करा, अशा सुचना त्यांनी दिल्या. क्षयरोगाच्या रुग्णांसोबत एचआयव्ही रुग्णांनाही मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी जिल्ह्यातील एचआयव्हीसह जगणारे रुग्ण, त्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, देहविक्रय करणाऱ्या महिला, समलिंगी संबंध असणाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली.


नवीन एचआयव्ही संसर्गितांना वेळेत उपचार मिळण्यासाठी तपासण्या वाढवा -जिल्हाधिकारी अमोल येडगे