बातम्या

भारतातील सर्वात महागडा अभिनेता दक्षिण सुपरस्टार रजनीकांत

Indias most expensive actor south superstar Rajinikanth


By nisha patil - 2/9/2023 7:33:08 PM
Share This News:



 रजनीकांत बस नाम ही काफी है... दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. अभिनेत्याचा 'जेलर'  हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत आहे. 10 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सिनेमाने जगभरात 600 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमासाठी अभिनेत्याने चांगलच मानधन घेतलं आहे. 

रजनीकांतच्या 'जेलर'ने जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 'जेलर' या सिनेमासाठी अभिनेत्याला 110 कोटी रुपये आधीच दिले होते. पण आता सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्याच्या मानधनात आणखी वाढ झाली आहे. रजनीकांतला 'जेलर' या सिनेमासाठी एकूण 210 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. त्यामुळे रजनीकांत हा देशातील सर्वात महागडा अभिनेता झाला आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.नेल्सन दिलीपकुमार यांनी 'जेलर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रजनीकांतच्या 'जेलर'ने अक्षय कुमारच्या  'ओहएमजी आणि सनी देओलच्या  'गदर 2' या सिनेमांना मागे टाकलं आहे. 'जेलर'ने भारतात आतापर्यंत 387 कोटींची कमाई केली आहे. 200 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र चांगलाच धमाका करत आहे.
 
'जेलर' या सिनेमात रजनीकांतसह तमन्ना भाटिया, राम्या कृष्णन, वसंत रवी आणि विनायकन महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तसेच या सिनेमात मोहनलाल, जॅकी श्रॉफ आणि शिव राजकुमार यांचीदेखील झलक पाहायला मिळत आहे. रजनीकांतचे चाहते 'जेलर' हा सिनेमा पाहायला पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जात आहेत. तामिळ आणि तेलुगू सिनेप्रेमी हा सिनेमा मोठ्या प्रमाणात पाहत आहेत.


भारतातील सर्वात महागडा अभिनेता दक्षिण सुपरस्टार रजनीकांत