बातम्या

शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची संकेतस्थळांवर उपलब्ध

Interim answer list of scholarship exam available on websites


By nisha patil - 7/3/2024 12:14:35 PM
Share This News:



महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूच परिषदेच्या www.mscepune.in तसेच https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. या अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन दिनांक १३ मार्च २०२४ पर्यंत परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

हे ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्रुटी किंवा आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दिनांक ६ ते १३ मार्च २०२४ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे. या ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) प्राप्त त्रुटी, आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही. तसेच विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही. विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक उपरोक्त कालावधीत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हे अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.


शिष्यवृत्ती परीक्षेची अंतरिम उत्तरसूची संकेतस्थळांवर उपलब्ध