बातम्या

शाहूंच्या विचारांचा जागर करणे महत्वाचे : देवदत्त कुंभार

It is important to awaken the thoughts of Shahu Devdutt Kumhar


By nisha patil - 6/26/2023 12:17:39 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  आपल्या करवीर संस्थानात शाहू महाराजांनी राबविलेले कल्याणकारी राज्याचे प्रारूप अर्थात मॉडेल आजही शासनकर्त्यांना मार्गदर्शक आहे.इतिहासाची मोडतोड करून इतिहास बदलू पाहणाऱ्या प्रवृत्ती समाजात कार्यरत असताना शाहूंचा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन ध्यानात घेतला पाहिजे. 
सर्वच क्षेत्रात लाखमोलाचे कार्य करून लोकराजा ही उपाधी सार्थ ठरवणाऱ्या शाहू महाराजांचा विचार आणि भविष्यवेधी दृष्टीकोन समाजाने आणि शासनकर्त्यांनी अंगीकारला पाहिजे.शाहू महाराजांनी अनेक  कलाकारांना , विद्वानांना राजाश्रय देऊन प्रोत्साहित केले. ज्या शाहूंच्या नगरीत शाहूंनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या सारख्या पुरोगामी विचारवंताला पाठबळ दिले , त्याच शाहूंच्या नगरीत कॉम्रेड पानसरे यांच्यासारख्या पुरोगामी विचारवंताचा खून होतो ,हे निश्चितच लज्जास्पद आहे. म्हणूनच शाहू राजांच्या विचारांचा जागर करणे आणि त्याचा अंगीकार करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे कार्यकर्ते व  अभ्यासक देवदत्त कुंभार यांनी व्यक्त केले. 

ते समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित 
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पूर्वदिनी आयोजित व्याख्यानात " राजर्षी शाहू आणि आजचा संदर्भ "या विषयावर बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व आंबेडकरवादी चळवळीचे नेते डी.एस. डोणे होते.स्वागत व प्रास्ताविक प्रसाद कुलकर्णी यांनी केले.

शहीद गोविंद पानसरे लिखित 'राजर्षी शाहू: वसा आणि वारसा 'हे पुस्तक सर्वप्रथम समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने प्रकाशित करण्यात आले.याचा उल्लेख करून देवदत्त कुंभार म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास समाजासमोर यावा म्हणून मराठीतील पहिले शिवचरित्र शाहू राजांनी कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांचे कडून लिहून घेतले.'गाव तेथे शाळा हे धोरण प्रत्यक्षात आणून आणि मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करून शाहू राजांनी शिक्षण सार्वत्रिक करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी वसतिगृहाची अभिनव संकल्पना राबवून कोल्हापूरला वसतिगृहाची जननी अशी ओळख निर्माण करून दिली. परंतु आजचे शासनकर्ते शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नावावर शिक्षणाचे बाजारीकरण करत आहेत.
देवदत्त कुंभार पुढे म्हणाले,आपल्या संस्थाना त चहाचे मळे कॉफीची लागवड तसेच रेशीम उद्योग असे शेतीतील अभिनव प्रयोग शंभर वर्षांपूर्वी करून यशस्वी केले. शेती शाळा, कृषी प्रदर्शन इत्यादीचे आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. महाराजांच्या काळा त एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही किंवा एकही भूकबळी गेल्याचे उदाहरण सापडत नाही. परंतु शाहूंचा जयजयकार करणारे आज मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे व संवेदनशील नजरेने पाहत नाहीत.महाराजांनी स्वतः मुस्लिम बोर्डिंग चे अध्यक्षपद स्वीकारून हिंदू मुस्लिम ऐक्य निर्माण केले. जातीभेदाचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीने विविध कायदे करून संस्थेचा ध्वज फडकविला. धार्मिक आणि जातीय दंगली घडवून आज समाजात शाहू विचारांची होत असलेली पायमल्ली थांबवून शाहूंच्या विचाराचा जागर करणे सामाजिक ऐक्यासाठी गरजेचे बनले आहे.महाराज स्वतः कुस्तीप्रेमी होते. कोल्हापूरला खासबाग मैदान करून कुस्तीची पंढरी म्हणून कोल्हापूरचा नावलौकिक निर्माण केला. देवाप्पा धनगर नावाच्या कुस्तीपटूच्या आकस्मिक निधनाने महाराजांना अश्रू अनावर झाले होते आणि आज मात्र राजधानी दिल्लीमध्ये अनेक महिला कुस्ती खेळाडू आपल्याला न्याय मिळावा म्हणून अश्रू ढळत आहेत.
अस्पृश्यता निर्मूलना सोबतच महाराजांनी स्त्रियांना शोषणापासून मुक्ती देण्याचा प्रयत्न विविध कायद्यांची निर्मिती करून केला. महाराजांनी त्या काळात डॉक्टर आपटे लिखित प्रसुती विज्ञान या पुस्तकाचा प्रसार आपल्या संस्थानात केला. स्त्री शिक्षणाबाबतचा महाराजांचा दृष्टिकोन त्यांनी स्वतःच्या सुनेला शिक्षन देऊन सर्वांसमोर दाखवून दिला.

अध्यक्षीय भाषणात डी.एस. डोणे म्हणाले, आजचे समाजकारण आणि राजकारण राजर्षी शाहू राजांच्या दृष्टिकोनापासून दूर जात आहे ही चिंतेची बाब आहे .शाहू राजांनी सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याचा प्रयत्न केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोठे सहकार्य केले. दलितांची चळवळ बळकट करण्यासाठी महाराजांनी मदत केली. देश स्वतंत्र झाल्यावर भारताची राज्यघटना तयार झाली. त्या राज्यघटनेचे शिल्पकार या नात्याने बाबासाहेबांनी मोठी भूमिका बजावली. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून भारतीय राज्यघटना मानली जाते. परंतु आज फुले ,शाहू ,आंबेडकर यांचा केवळ नावासाठी वापर करून मनूवादी व्यवस्था निर्माण होण्याचा प्रयत्न होतो आहे. तो हाणून पाडण्याची गरज आहे.त्यासाठी सैद्धांतिक प्रबोधन चळवळ गतिमान करणे ही काळाची गरज आहे. समाजवादी प्रबोधिनी ते काम सातत्याने गेली साडेचार दशके करत आहेत. त्याचे महत्त्व मोठे आहे.
यावेळी अन्वर पटेल,प्रा.रमेश लवटे,तुकाराम अपराध,दयानंद लिपारे, पांडुरंग पिसे,महालिंग कोळेकर,अशोक मगदूम,मनोहर जोशी,शहाजी धस्ते यांच्यासह अन्य उपस्थित होते.
आभार सचिन पाटोळे यांनी मानले.


शाहूंच्या विचारांचा जागर करणे महत्वाचे : देवदत्त कुंभार