बातम्या
मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरे जाणे गरजेचे
By nisha patil - 10/27/2023 7:13:57 PM
Share This News:
कसबा बावडा/वार्ताहर कोणत्याही कंपनीच्या मुलाखतीला जात असताना स्वतःकडे आत्मविश्वास हवा. जेवढा आत्मविश्वास जास्त तेवढी मुलाखतीमध्ये यशाची खात्रीही अधिक असते, असे प्रतिपादन नॅस्कॉमचे विभागीय प्रमुख सचिन म्हस्के यांनी केले. मिशन रोजगार अंतर्गत मुलाखतीचे तंत्र याविषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आमदार सतेज डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन रोजगार’ अंतर्गत 5 व 6 नोव्हेंबर रोजी ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘मिशन रोजगार’ अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुलाखतीचे तंत्र याविषयावर नॅस्कॉमचे विभागीय प्रमुख सचिन म्हस्के यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते. डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते डॉ. मस्के यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी, डॉ. संतोष चेडे, डॉ. अजित पाटील उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सचिन म्हस्के म्हणाले, ज्या कंपनीच्या मुलाखतीसाठी आपण जाणार आहोत त्या कंपनीची उत्पादन आणि सर्व प्रक्रियांची सखोल माहिती घेणे आवश्यक आहे.नवनवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे असून त्यावर आपल्या रिझ्युमेमध्येही फोकस असावा. विविध सॉफ्ट स्कील वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. व्यक्तिमत्वाची छाप पडावी असा पोशाख असावा, ग्रुमिंगवरही लक्ष द्यावे.
मुलाखत यशस्वी होण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबाबत त्यांनी उदाहरणासह सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उमेदवारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तर दिले. मुलाखत तंत्र व कौशल्याबाबत छोट्या- छोट्या टिप्स देत ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’मध्ये सहभागी विविध कंपन्याच्या मुलाखतीमध्ये यशस्वी होण्यासाठी म्हस्के यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
कसबा बावडा: उमेदवारांना मार्गदर्शन करताना नॅस्कॉमचे विभागीय प्रमुख सचिन म्हस्के, उपस्थित उमेदवार.
मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरे जाणे गरजेचे
|