बातम्या

राजेखान जमादार अटक कारवाईसाठी पत्रकारांची कोल्हापूरात निदर्शने

Journalists protest in Kolhapur for arrest of Raje Khan Jamadar


By nisha patil - 10/5/2024 4:54:57 PM
Share This News:



कोल्हापूर :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्यावर पत्रकारास मारहाण केल्याचा गुन्हा मुरगुड पोलीस ठाण्यामध्ये पहाटे दाखल झाला. याप्रकरणी पत्रकार प्रकाश तीराळे यांनी फिर्याद दिली आहे.दरम्यान राजेखान जमादार यांच्यावर या गुन्ह्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी कोल्हापूर, इचलकरंजी मुरगुड यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी आज जोरदार निदर्शने करण्यात आली.
तर,पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण करणाऱ्या राजेखान जमादार याला अटक करावी , शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख पदावरून हकालपट्टी करावी , अशी मागणी मुरगुड येथील पत्रकारांनी केली. शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी मुरगुड येथील एका पत्रकारास गुरुवारी सायंकाळी मारहाण केली. बातमी छापल्याच्या रागातून हे कृत्य केले असून याबाबत मुरगूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. त्यांनी गणेश मंदिर चौकात मुरगूड पत्रकार प्रकाश तिराळे हे पत्रकार दुचाकीवरून जात असताना त्यास अडवले.

बातमी का छापली अशी विचारणा करत शिवीगाळ केली. यावेळी त्यांच्या चालक व एका कार्यकर्त्यांनी पत्रकार तिराळे यास धरून ठेवले. जमादार यांनी श्रीमुखात भडकवली. यानंतर तिराळे यांनी मुरगूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून गुन्हा दाखल केला. कोल्हापुरातील दसरा चौकामध्ये कोल्हापूर प्रेस क्लब, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने जमादार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. गुंड प्रवृत्तीचे राजेखान जमादार यांच्यावर पत्रकार मारहाण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शितल धनवडे यांनी केली.


राजेखान जमादार अटक कारवाईसाठी पत्रकारांची कोल्हापूरात निदर्शने