बातम्या

रोखठोक किरण मानेंची बेधडक उत्तरे

Kiran Manes fearless answers


By nisha patil - 9/1/2024 8:43:57 PM
Share This News:



मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे अभिनेते, 'सातारचा बच्चन' म्हणून 'बिग बॉस'गाजवणारे किरण माने नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. रोखठोक विधान, राजकीय वक्तव्य, फेसबुक पोस्ट यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण आता समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने शिवबंधन बांधत त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे
 

मीडियाशी बोलताना ते म्हणाले"अभिनयासह मी परिवर्तनाच्या चळवळीतही काम करतो. आजची परिस्थिती खूपच बिघडली आहे. आज माणसामाणसात फूट पाडली जात आहे. जातीधर्मावरुन द्वेश निर्माण केला जात आहे. या गढूळलेल्या वातावरणात खूप अस्वस्थता आहे. कलाकार हा संवेदनशील असतो. निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, पुल देशपांडे अशा अनेक मंडळींनी आजवर राजकीय परस्थितीवर भाष्य केलेलं आहे. एकंदरीतच कलाकाराला समाजभान असायलाच हवं".
 

"समाजासाठी काम करायला एखादा राजकीय प्लॅटफॉर्म असायला हवा, असं मला वाटलं. विचार मांडायला राजकीय प्लॅटफॉर्म हवा होता. त्यामुळे त्यातल्या त्यात योग्य प्लॅटफॉर्मची मी निवड केली. आज या व्यवस्थेविरुद्ध उघडपणे लढणारे कोण आहेत? या व्यवस्थेचा सगळ्यात जास्त डॅमेज कोणाला झालाय तर उद्धव ठाकरेंना. ठाकरेंची सेना मला कायम जवळची आहे. उद्धव ठाकरे हे खूप संवेदनशील आहेत. ठाकरे घराण्याने कलाकारांना खूप आदराचं स्थान दिलं आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून ते नाना पाटेकरांपर्यंत अनेक कलाकारांना ठाकरे कुटुंबियांनी खूप प्रेम दिलं आहे. त्यामुळे मला उद्धव ठाकरेंची ओरिजनल शिवसेना खूप जवळची वाटते".
 

शिवबंधन बांधण्याच्या निमित्ताने किरण माने यांना 'मातोश्री'त जाता आलं आहे. मातोश्रीमध्ये आलेल्या अनुभवाबद्दल बोलताना किरण माने म्हणाले,"मातोश्रीचा अनुभव खूपच रोमांचकारी होता. कारण लहानपणापासून मातोश्रीबद्दल एक गूढ आकर्षण होतं. मुंबईतील हेरिटेज वास्तूंपैकी 'मातोश्री' एक आहे. महाराष्ट्राच्या 40 वर्षांच्या राजकारणात मातोश्रीला मोठं स्थान आहे".


किरण माने पुढे म्हणाले,"महाराष्ट्राच्या राजकारणातल्या कितीतरी घडामोडी मातोश्रीमध्ये घडल्या असतील. या वास्तूत जाताना एक वेगळाच आनंद होता. रश्मी वहिनींनी केलेलं आदरातिथ्य भारावून टाकणारं होतं. त्यावेळी मला कळलं की मातोश्री मायेनं जवळ करणारी वास्तू आहे". 
 

निवडणूक लढवणार का? याबद्दल बोलताना किरण माने म्हणाले,"मला कोणतीही महत्त्वकांक्षा नाही. दिलेली जबाबदारी 100%  देत पूर्ण करण्यावर माझा भर असेल. वाईट परिस्थिती बदलायची अशी सध्याची महत्त्वकांक्षा आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या प्रश्नावर बोलता यावं, सत्ताधाऱ्यांना जाब विचारता यावा हा बदल घडवून आणायचा एवढीच माझी महत्त्वकांक्षा आहे".


रोखठोक किरण मानेंची बेधडक उत्तरे