बातम्या
कोल्हापूर : प्रत्येक महाविद्यालय घेणार 5 गावे दत्तक
By nisha patil - 2/1/2024 12:59:05 PM
Share This News:
कोल्हापूर : प्रत्येक महाविद्यालय घेणार 5 गावे दत्तक
सामाजिक उपक्रम म्हटले की, फक्त राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) एवढाच विचार केला जात असे. काही विद्यार्थी एखादे गाव दत्तक घेऊन तीन-चार दिवसांचा कॅम्प लावीत. परंतु, आता शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येक महाविद्यालय पाच गावे दत्तक घेणार आहे.एन्व्हायर्न्मेंट नोडल ऑफिसरच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, गावांचा शाश्वत विकास साधला जाणार आहे.
सध्या पर्यावरण आणि त्यासंदर्भातील अनेक समस्या भेडसावत आहेत. या पार्श्वभूमीवर नुकताच शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत पर्यावरणाच्या अनुषंगाने दत्तक गावे आणि पर्यावरण संरक्षण समिती स्थापन करणे, असे दोन ठराव मंजूर झाले आहेत. दत्तक गाव योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये त्या गावांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तेथे असलेल्या समस्यांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर समस्यांचे शास्त्रीय आधारावर विश्लेषण केले जाईल. तेथील समस्यांचे निवारण करण्यासाठी योजना आखली जाणार आहे. तसेच योजनांची अंमलबजावणी करणे, तेथील परिवर्तन स्थितीमध्ये परिवर्तन झाल्याचा अहवाल सादर करणे, या सर्व गोष्टींची जबाबदारी आता महाविद्यालयांकडे राहणार आहे.
विद्यापीठामध्ये पदवी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाला प्रत्येकी दोन वृक्षारोपण व संगोपन करणे बंधनकारक करावे. त्याचे जिओ टॅगिंग करून फोटो, व्हिडीओ रिपोर्ट सादर करण्याची शिफारस अधिसभेने संबंधित मंडळास केली आहे. या ठरावाची अंमलबजावणी झाल्यावर प्रत्येक विद्यार्थ्याला सहा वृक्षांचे रोपण व संगोपन करण्याचे पुरावे महाविद्यालयात सादर करावे लागणार आहेत.
कोल्हापूर : प्रत्येक महाविद्यालय घेणार 5 गावे दत्तक
|