बातम्या

‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ ठरेल युवा पिढीच्या करिअरचा टर्निंग पॉईंट- आ. सतेज पाटील

Kolhapur Dakshin Job Fair will be for the young generation Career turning point Satej Patil


By nisha patil - 6/11/2023 12:05:59 AM
Share This News:



‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ ठरेल युवा पिढीच्या करिअरचा टर्निंग पॉईंट- आ. सतेज पाटील
- दोन दिवसीय जॉब फेअरचे साळोखेनगर येथे उद्घाटन 
- युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

कोल्हापूर/ आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन रोजगार’ अंतर्गत  आयोजित  ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ हे नोकरी इच्छुकांसाठी मोठे व्यासपीठ आहे.  हे दोन दिवस आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असून मुलाखतीला आत्मविश्वासाने व संयमाने सामोरे जावे असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी केले. 

साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॅम्पस् येथे आयोजित दोन दिवसीय ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या जॉब फेअरमध्ये २४८ कंपनी सहभागी झाल्या असून १५,००० हून अधिक   नोकरी इच्छूकांनी नोंदणी केली आहे. या ठिकाणी सकाळपासूनच गर्दीचा महापूर उसळला. कळंबा ते फुलेवाडी रिंगरोडवर दुतर्फा वाहनाची गर्दी झाली होती. आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, द डेटा टेक लॅबचे सीईओ डॉ अमित आंद्रे, ‘नॅस्कॉम’चे विभागीय प्रमुख सचिन म्हस्के यांच्यासह विविध औद्योगिक संघटना पदाधिकारी व उद्योजकांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने ‘जॉब फेअर’चे उद्घाटन केले.

  यावेळी मार्गदर्शन करताना आमदार सतेज पाटील म्हणाले, आयुष्यात संधी खूप असतात मात्र तिथपर्यंत पोहोचणे खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराने किमान एक तरी कौशल्य आत्मसात करावे. आधुनिक तंत्रज्ञान व विविध ॲप्सचा वापर करून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान पूरक व्हावे. नवनवीन गोष्टींचे ज्ञान मिळवून आत्मविश्वास वाढवावा. मुलाखत दिल्यानंतर स्वतःचे मूल्यमापन करा, आपण कुठे कमी पडलो हे तपासा आणि त्या चुका पुढच्या वेळी दुरुस्त करा. 

   या जॉब फेअर मध्ये नोकरीच्या चांगल्या संधी मिळतीलच. मात्र ज्यांना संधी मिळणार नाही त्यांच्यासाठी पुढच्या वेळेसाठीचा चांगला अनुभव व आत्मविश्वास या ठिकाणी निश्चितच मिळेल. ज्यांना संधी मिळणार नाही त्यांना यापुढेही ‘मिशन रोजगार’च्या माध्यमातून जॉब अलर्ट व  माहिती पोचवली जाईल.  त्याचबरोबर आत्मविश्वासाने मुलाखतीसाठी सामोरे जाता यावे यासाठी कायमस्वरूपी फिनिशिंग स्कूल सुरू करणार असल्याचे यावेळी आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
  
 आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, युवा पिढीला नोकरीच्या संधी चांगल्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  या ‘जॉब फेअर’ उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सहभागी संस्थाचे आभार मानून  नोकरी इच्छुकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, आमदार ऋतुराज पाटील यानी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व उद्योग संघटनांच्यावतीने अभिनंदन करतो.  पुढील १० वर्षे मोठ्या संधीची आहेत. अपयशाने नाराज होऊ नका, ही सुरुवात असून नव्या संधीना सामोरे जावे.

सहभागी कंपन्याच्यावतीने सिंटेल ग्लोबलचे सीएचआरओ सुधीर मतेती म्हणाले, युवक-युवतीने मोठी कंपनी, मोठे पॅकेज अशा मोठ्या अपेक्षा न ठेवता प्रथम कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश करावा. सरस्वतीची पूजा करा, लक्ष्मी आपोआप येईल. चांगले काम करून आपली ओळख बनवा.

डॉ अमित आंद्रे म्हणाले, या जॉब फेअरच्या माध्यमातून नक्कीच आपले लाईफ बदलेल. आपली कौशल्ये ठामपणे कंपनी प्रतिनिधींसमोर मांडा. प्रामणिक प्रयत्न करा, यश नक्की मिळेल.

प्राचार्य डॉ महादेव नरके यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी गोशिमाचे दिपक चोरगे, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे दिनेश बुधले, इंजिनिअरिंग व आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराणे, क्रीडाईचे गौतम परमार, संदीप मिरजकर, आदित्य बेडेकर, आयटी असोसिएशनचे प्रताप पाटील, मॅकचे हरिश्चंद्र धोत्रे, उद्योजक तेज घाटगे, नितीन दलवाई, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.


आमदार ऋतुराज पाटील यांच्या नियोजनाचे कौतुक आमदार पाटील यांनी गेले काही महिने  प्रचंड मेहनत करून राज्यातील व राज्य बाहेर 250 कंपन्या एकाच व्यासपीठाखाली आणून युवा पिढीसाठी अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे. आमदार म्हणून नव्हे तर एक युवक म्हणून त्यांनी घेतलेले कष्ट व नियोजनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो असे सांगत आमदार सतेज पाटील यांनी कौतुक केले.


डॉ. संजय डी. पाटील यांनी साधला संवाद डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांनी जॉब फेअर मध्ये सहभागी झालेल्या सर्व कंपनीच्या  प्रतिनिधीची  भेट घेऊन त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर त्यांनी सहभागी युवक-युवतींशी संवाद साधून उत्तम करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.

साळोखेनगर: ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’चे उद्घाटन करताना आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज संजय पाटील, डॉ. अमित आंद्रे, सचिन म्हस्के, सुरेंद्र जैन, दिपक चोरगे व विविध संघटनाचे प्रतिनिधी.


‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ ठरेल युवा पिढीच्या करिअरचा टर्निंग पॉईंट- आ. सतेज पाटील