बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा महापुराची टांगती तलवार
By nisha patil - 7/25/2024 12:38:30 PM
Share This News:
पंचगंगा नदीने धोका पातळी गाठल्याने कोल्हापूरकर पुन्हा एकदा धास्तावले आहेत. पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट 1 इंचांवर गेली आहे. त्यामुळे आता जितकी पाण्याची पातळी वाढत जाईल तितकं पाणी कोल्हापूर शहराच्या आणि महामार्गावर सुद्धा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरु आहेत. पुरग्रस्त भागातून स्थलांतर सुरु करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांची पुरसदृश्य स्थिती असल्याने वाहतुकीवर विपरित परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यांयी मार्गांनी वाहतूक सुरु आहे.
कोल्हापूरकरांच्या 2019 आणि 2021 मधील आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्यामुळे पंचगंगा नदी धोका पातळीकडे गेल्याने पुणे बंगळूर महामार्गावर पाणी येणार का? अशी भीती निर्माण झाली आहे. शिरोलीत पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या शिये-कसबा बावडा मार्गावर पाणी आल्यानं सद्यस्थितीत वाहतूक बंद करण्यात आली आहे. नदीपात्रातील अतिक्रमणामुळे यावर्षी तब्बल पाच फूट पाणी लवकर आलं आहे. कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदी 43 फूट 1 इंचावर असून साधारण 47 फुटांवर गेल्यास राष्ट्रीय महामार्गावर पाणी येऊन महामार्ग बंद होऊ शकतो.
कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा महापुराची टांगती तलवार
|