कोल्हापूर चित्रनगरीमध्ये चित्रपट शूटिंगसाठी आशुतोष गोवारीकर सकारात्मक
By nisha patil - 5/29/2023 7:58:17 PM
Share This News:
कोल्हापूर/ आमदार ऋतुराज पाटील यांच्या विनंतीनुसार प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी कोल्हापुरातील चित्रनगरीला भेट दिली. या ठिकाणी उपलब्ध सुविधा, सेट यांची माहिती घेतली. आ. पाटील यांनी चित्रनगरीमध्ये आपल्या एखाद्या चित्रपटाचे शूटिंग करावे अशी विनंती गोवारीकर यांना केली. यामुळे स्थानिक कलाकारांना संधी मिळेल आणि लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही आ.पाटील यांनी सांगितले. श्री. गोवारीकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. चित्रपट सृष्टीसाठी कोल्हापूरने दिलेल्या योगदानाच्या आठवणी गोवारीकरण यांनी यावेळी सांगितल्या.
सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास आ. ऋतुराज पाटील यांनी श्री. गोवारीकर यांचेसोबत चित्रनगरीला भेट दिली. यावेळी चित्रनगरीचे व्यवस्थापक दिलीप भांदीगरे यांनी त्यांना त्या ठिकाणी असलेला वाडा, कोर्ट, हॉस्पीटल, पोलीस स्टेशन, यासह अन्य सेटची सविस्तर माहिती दिली. तसेच चित्रनगरीमध्ये उपलब्ध असलेली लोकेशन्स सुध्दा दाखविली. चित्रपट सृष्टीचे माहेरघर असलेल्या कोल्हापूरातील चित्रनगरीमध्ये अशा प्रकारच्या सर्व गोष्टी पाहून गोवारीकर यांनी समाधान व्यक्त केले. तसेच मालिकांच्या शुटींगबरोबरच चित्रपटांचे शुटींग होणे आवश्यक असून त्यामुळे कोल्हापूर चित्रनगरीची फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगली इमेज तयार होईल, असे त्यांनी सांगितले.
आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले की, कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या विकासासाठी आ. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. याठिकाणी मालिकांबरोबरच चित्रपटांचे शुटींग सुरु झाल्यास स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे अशा प्रकारची शुटींग होण्यासाठी आपण सहकार्य करावे अशी विनंतीही गोवारीकर यांना केली.
यावेळी अष्टविनायक मिडियाचे संग्राम पाटील, डॉ. महादेव नरके, मोरेवाडीचे सरपंच ए.व्ही. कांबळे, ग्रा.पं. सदस्य अमर मोरे, सौ. सिद्धी कारंडे, सुदर्शन पाटील, ऋषिकेश व्हुन्नुरे, उजळाईवाडीचे नंदकुमार मजगे उपस्थित होते.
कोल्हापूर चित्रनगरीमध्ये चित्रपट शूटिंगसाठी आशुतोष गोवारीकर सकारात्मक
|