बातम्या

कोल्हापूरकरांना 12 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

Kolhapur residents have enough water for 12 days


By nisha patil - 6/24/2023 4:51:54 PM
Share This News:



यंदाचा मान्सून लांबल्याने जिल्ह्यातील राधानगरी, दूधगंगा (काळम्मावाडी), वारणा आदी मोठय़ा व लहान अशा एकूण 15 व 91.81 टीएमसी क्षमतेच्या धरण प्रकल्पांत सध्या केवळ 19.14 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जेमतेम दहा ते बारा दिवस पुरेल इतकाच हा पाणीसाठा असून, बहुतांश ठिकाणी शेतीसाठी उपसा बंद करण्यात आला आहे. आता केवळ पिण्यासाठीच पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जून महिना कोरडा गेल्याने आता सर्वांनाच पावसाची ओढ लागली आहे.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून साकारलेले राधानगरी धरण कोल्हापूरला सुजलाम् सुफलाम् करणारे ठरले. पाठोपाठ दूधगंगा (काळम्मावाडी), तुळशी, वारणा, कुंभी, कासारी, चित्री, पाटगाव ते आंबेओहोळ अशा 15 लहान-मोठय़ा धरण प्रकल्पांनी जिल्हा पाणीदार आणि हिरवागार बनवला. गेल्या वर्षीचा पाऊस यंदा जानेवारीपर्यंत लांबला होता. त्यामुळे जिह्यातील सर्व धरणांतील पाण्याचा साठा पाहाता, यावेळी पाणीटंचाईची भीषणता जाणवेल, असे कोणालाही वाटले नाही. पण यंदा वळवाचा पाऊस समाधानकारक झाला नाही. शिवाय जूनचे तिन्ही आठवडे कोरडे गेल्याने सर्वच धरणांनी तळ गाठला आहे. धरणात केवळ मृतसाठाच शिल्लक आहे. शहरात एक दिवसआड पाणीपुरवठा सुरू असून, ग्रामीण भागातही आता पाणीटंचाईची झळ प्रचंड प्रमाणात जाणवू लागली आहे.

8.361 टी.एम.सी. क्षमतेच्या राधानगरी धरणात 1.58 टी.एम.सी. (18.86 टक्के), 25.29 टी.एम.सी. क्षमतेच्या दूधगंगा (काळम्मावाडी) धरणात 1.17 टीएमसी (4.62 टक्के), 3.471 टीएमसी क्षमतेच्या तुळशी धरणात 0.84 टीएमसी (24.15 टक्के), 34.399 टीएमसी क्षमतेच्या वारणा धरणात 10.60 टीएमसी (30.82 टक्के), 2.774 टीएमसी क्षमतेच्या कासारी धरणात 0.44 टीएमसी (15.71 टक्के), 2.516 टीएमसी क्षमतेच्या कडवीमध्ये 0.76, (30.16 टक्के), 2.715 टीएमसी क्षमतेच्या कुंभीमध्ये 0.79 टीएमसी (29.05 टक्के), 3.716 टीएमसी क्षमतेच्या पाटगावमध्ये 0.76 टीएमसी (20.52 टक्के), 1.522 टीएमसी क्षमतेच्या चिकोत्रामध्ये 0.43 टीएमसी (28.14 टक्के), 1.886 टीएमसी क्षमतेच्या चित्रीमध्ये 0.30 टीएमसी (15.85 टक्के), 1.223 टीएमसी क्षमतेच्या जंगमहट्टीत 0.26 टीएमसी (21.57 टक्के), 1.560 टीएमसी क्षमतेच्या घटप्रभात 0.63 टीएमसी (40.61 टक्के), 0.820 टीएमसी क्षमतेच्या जांबरेमध्ये 0.16 टीएमसी, (19.75 टक्के), 1.240 टीएमसी क्षमतेच्या आंबेओहोळमध्ये 0.40 टीएमसी (31.99 टक्के) तर 0.214 a क्षमतेच्या कोदे या लघुपाटबंधारे प्रकल्पात 0.02 टीएमसी (9.57 टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

16 वर्षांनी काळम्मावाडी धरणाने गाठला तळ
1982मध्ये दूधगंगा (काळम्मावाडी) धरण बांधण्यात आले. याची क्षमता 27.43 टीएमसी असली तरी यात 25.29 टीएमसी पाणीसाठा केला जात असून, यातील 23.99 टीएमसी पाण्याचा वापर होतो. या धरणामध्ये 1.17 टीमसी म्हणजेच 4.62 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सोळा वर्षांनंतर या धरणाने तळ गाठला आहे.


कोल्हापूरकरांना 12 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक