बातम्या
इंडो - युएस आय.टी.पार्क साठी कोल्हापूरला प्राधान्य द्यावे : राजेश क्षीरसागर
By nisha patil - 8/28/2024 10:31:30 PM
Share This News:
कोल्हापूर, : देशाची व राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य शासनाकडून मित्रा संस्थेच्या माध्यमातून विविध प्रयोजने राबविली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक स्थिती उद्योग, आयटी क्षेत्रासाठी पूरक असून, शासनाने यासाठी जागा आरक्षित ठेवल्या आहेत. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपास कोणतेही आय.टी.पार्क नसल्याने जिल्ह्यातील हजारो युवकांना दुसऱ्या जिल्ह्यात, राज्यात नोकरीसाठी जावे लागते. या युवकांना कोल्हापुरातच रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या व पर्यायाने राज्याच्या व देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी इंडो - युएस आय.टी.पार्क निर्माण होण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी भारतातील युएस दूतावास आणि वाणिज्य दूतावासचे कौन्सुल जनरल माईक हॅन्के यांच्याकडे केली.
कौन्सुल जनरल माईक हॅन्के यांच्यासह व्हा.कौन्सुल फोर पॉलिटिकल अफेअर्स रियान म्युलेन हे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्यासह भारतातील युएस दूतावास अधिकाऱ्यांची सयाजी हॉटेल येथे बैठक पार पडली.
बैठकीच्या सुरवातीस कौन्सुल जनरल माईक हॅन्के यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने, औद्योगिक वसाहती, आरोग्य सुविधा आदींची माहिती घेतली. यासह औद्योगिक वसाहतींमधील कर्मचारी वर्गासाठी आरोग्य विषयक सेवा सुविधा पुरविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक महासत्ता बनण्यास सज्ज झाला आहे. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील वाढत्या आर्थिक संबंधामुळे अमेरिका २०२३ साली भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे. दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापारात सुमारे ७.६५ टक्क्यांनी झालेली वाढ दोन्ही देशांच्या विकासात मोलाची भर टाकणारी आहे. सद्याच्या घडीला उद्योग क्षेत्रासह, आय.टी. क्षेत्रात नवी क्रांती घडत आहेत. त्यामुळे बहुतांश युवा पिढीने या दोन्ही क्षेत्रातील सक्रियता वाढविली आहे. राज्याचा विचार करता मुंबई, पुणे अशा विकसित शहरांमध्ये आय.टी. पार्कच्या संकल्पना राबविल्या गेल्याने ग्रामीण दुर्गम भागातील युवकांना नोकरीसाठी त्या शहरात जाणे भाग पडत आहे. सद्या राज्य शासनाने मित्रा संस्थेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागात विविध प्रयोजनांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीस प्राधान्य दिले आहे. कोल्हापुरात नुकतीच राज्याची पहिली शाश्वत विकास परिषद पार पडली असून यामध्ये उद्योग, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, कृषी, व्यापार यासह शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. भारतातील विकसित शहरांचा विचार करता बेंगलोर, हैदराबाद, पुणे आदी शहरामध्ये आयटी क्षेत्र सर्वात जलद गतीने कार्यानिव्त झाले आहे. यामुळे या शहरांत रोजगार निर्मितीसह शहराच्या विकासामध्ये मोलाची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी औद्योगिक क्षेत्रासह कोल्हापुरात इंडो - युएस (भारत - अमेरिका) आय.टी.पार्क उभारण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली.
यावेळी कौन्सुल जनरल माईक हॅन्के यांच्यासह व्हा.कौन्सुल फोर पॉलिटिकल अफेअर्स रियान म्युलेन आणि युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर उपस्थित होते.
इंडो - युएस आय.टी.पार्क साठी कोल्हापूरला प्राधान्य द्यावे : राजेश क्षीरसागर
|